मेटल कंपनीच्या मालकाची हत्या करुन मृतदेह जाळला, तिघांना अटक

मेटल कंपनीच्या मालकाची हत्या करुन मृतदेह जाळला, तिघांना अटक

पालघर : अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली यांची अपहरण कर्त्यांकडून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालघर येथून आरिफ मोहम्मद यांचं अपहरण झालं होतं. पोलिसांत तक्रार केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी आरिफ मोहम्मद यांची हत्या केली. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

गेल्या 9 मे रोजी पालघरच्या जुना सातपाटी रोड येथून दुपारी 2 च्या सुमारास आरिफ मोहम्मद अली यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींच्या तक्रारीवरुन पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांनी अपहरकर्त्यांचा शोध घेण्यापूर्वीच आरिफ मोहम्मद अली यांची अपहरकर्त्यांकडून हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने अपहरकर्त्यांनी आरिफ मोहम्मद यांचा मृतदेह जाळला. या प्रकरणी पोलिसांनी आरिफ मोहम्मद यांच्या कंपनीचा कामगार ठेका असलेल्या प्रशांत संखे, रामदेव संखे आणि प्रशांत महाजन या तिघांना वापी आणि अंमळनेर येथून अटक केली आहे.

आरोपींनी आरिफ मोहम्मद यांचं अपहरण करुन हत्या केल्याची कबुली दिली आहे. व्यावसायिक वादातून हे अपहरण करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींच्या सांगण्यावरुन, जिथे त्यांनी आरिफ यांचा मृतदेह जाळून फेकला, त्याठिकाणी पोलिसांना केवळ राख आढळून आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचे पुरावे फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले असून, त्यानंतरच या घटनेचा उलगडा होऊ शकेल. मात्र, पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याने आरिफ मोहम्मद यांची हत्या झाल्याचा आरोप आता नातेवाईक करत आहेत.

Published On - 8:03 am, Tue, 14 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI