‘हिरकणी’च्या वाटेतील ‘हाऊसफुल्ल 4’चा बुरुज मनसे फोडणार का?

| Updated on: Oct 23, 2019 | 9:24 AM

'हिरकणी' या मराठी चित्रपटाला स्क्रीन्स उपलब्ध करुन न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने पुन्हा खळ्ळखट्यॅकचा इशारा दिला आहे.

हिरकणीच्या वाटेतील हाऊसफुल्ल 4चा बुरुज मनसे फोडणार का?
Follow us on

मुंबई : एकीकडे लेकरासाठी बुरुज उतरुन आलेली ‘हिरकणी’ आणि दुसरीकडे तिच्या आयुष्यावर आधारित ‘हिरकणी’ हा चित्रपट. हिरकणीप्रमाणेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाटही अवघड झालेली दिसत आहे. बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ‘हाऊसफुल 4’ मुळे ‘हिरकणी’ला चित्रपटगृह मिळण्यात अडथळे उभे राहत आहेत. त्यामुळे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने पुन्हा खळ्ळखट्यॅकचा इशारा (MNS warns Multiplex owner for Hirkani) दिला आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट उद्या म्हणजेच 24 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या निमित्ताने विशेष मेजवानी यानिमित्ताने मिळणार आहे. परंतु शुक्रवारी ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने हिरकणी चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत आहेत.

‘हिरकणी’ चित्रपटाला चित्रपटगृह दिले नाहीत तर काचा फुटणार, असा इशारा मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने मराठी चित्रपटाच्या खेळांना आडकाठी करणाऱ्या चित्रपटगृह मालकांना खळ्ळखट्यॅकचा इशारा दिला आहे. ‘हिरकणी’ला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसेचे कार्यकर्ते आज (23 ऑक्टोबर) चित्रपटगृह मालकांची भेट घेणार आहेत.

रेल्वेची पहिली ‘प्रमोशन ऑन व्हील्स’ ट्रेन, ‘हाऊसफुल-4’…

याआधीही ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यात अडचणी आल्या होत्या, त्यावेळी मनसेने आंदोलनाचं शस्त्र उपसलं होतं. बिग बजेट हिंदी चित्रपट समोर असताना बऱ्याच वेळा मराठी चित्रपटांची गळचेपी होताना दिसते.

अभिनेता प्रसाद ओक याने ‘हिरकणी’चे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हिरकणीची कथा-पटकथा लिहिली आहे.

‘हाऊसफुल्ल 4’मध्ये अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा, नवाजुद्दीन सिद्दीकी, चंकी पांडे, शरद केळकर, राणा डुगुबट्टी अशी कलाकारांची फौज आहे.