सातारा : मोबाईल शॉपीत बॅलन्सचे व्हाऊचर मारण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींचे मोबाईल क्रमांक त्यांना न कळत सेव्ह करून अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील कराड शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने उघडकीस आणला. ज्या दुकानात व्हाऊचर मारल्यावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती, त्या मोबाईल शॉपी चालकास निर्भया पथकाने अटक केली. गणेश दसवंत (रा. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या मोबाईल शॉपी चालकाचे नाव आहे.
कराड येथील महिला महाविद्यालय परिसरात गणेश झेरॉक्स सेंटर आणि मोबाईल शॉपी आहे. मोबाईल शॉपीत महाविद्यालयात येणाऱ्या काही मुलींसह परिसरातील महिला मोबाईलचे व्हाऊचर मारण्यासाठी येत होत्या. व्हाऊचर मारल्यानंतर काही वेळातच त्या महिला किंवा मुलींना अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती.
त्याच दुकानात व्हाऊचर मारण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात झाली. महिलेने हा प्रकार कुटुंबीयांसह काही मैत्रिणींना सांगितला. त्यांनी पोलीस ठाण्यात येत निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रेखा देशपांडे यांना हा प्रकार सांगितला. पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सापळा रचला.
पोलिसांनी त्या मोबाईल शॉपीत एक बनावट महिला ग्राहक म्हणून एका महिलेला व्हाऊचर मारण्यास पाठवले. व्हाऊचर मारून आल्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या त्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज येऊ लागले. गणेश दसवंत याच्या मालकीच्या मोबाईल शॉपीत व्हाऊचर मारल्यावरच महिलांना अश्लील मेसेज येत आहेत अशी खात्री पोलिसांना पटली. त्यामुळे पोलिसांनी गणेश दसवंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईल शॉपीत व्हाऊचर मारल्यानंतर वेगवेगळ्या दोन मोबाईल नंबरवरून महिलांना अश्लील मेसेज येत असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी संशयिताला अटक करण्याची कार्यवाही सुरू केली.
निर्भया पथकाने केलेल्या या कारवाईमुळे महिला आणि मुलींच्यात समाधानाचे वातावरण आहे. संशयितावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता वाढू लागली आहे.