एका जागेसाठी मोदी लक्षद्विपला गेले, पण ते मणिपूरला जाऊ शकत नाहीत; संजय राऊत यांची खरमरीत टीका

| Updated on: Jan 15, 2024 | 1:03 PM

Sanjay Raut on PM Narendra Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्विप दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राम मंदिराच्या उद्धाटनावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेवरही त्यांनी भाष्य केलं.

एका जागेसाठी मोदी लक्षद्विपला गेले, पण ते मणिपूरला जाऊ शकत नाहीत; संजय राऊत यांची खरमरीत  टीका
Follow us on

गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी | 15 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांआधी लक्षद्विपला भेट दिली. यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये का गेले नाहीत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सीट साठी लक्षदीपमध्ये जाऊ शकतात. मात्र गेल्या दीड वर्षापासून पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. राहुल गांधी मणिपूरमध्ये पोहचले. मात्र मोदी लक्षदीपमध्ये जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी मालदीवबरोबर भांडण करत आहेत. राहुल गांधी यांनी बोलणं योग्य आहे. हे राजकारण देश हितासाठी नाही हे फक्त भाजप पक्षाच्या निवडणुकीसाठी राजकारण आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

राममंदिराच्या मुद्द्यावर राऊत म्हणाले…

येत्या 22 जानेवारीला राममंदिराचं उद्घाटन होणार आहे. राम मंदिर हा विषय देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात शिवसेनेला लक्ष करण्याचा विषय वाटत असेल. तर फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातला राम मंदिर लढाई आणि त्याचा इतिहास समजून घ्यावा. फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी. त्यांना अर्धवट उपमुख्यमंत्री बनवलं आहे. त्याकडे त्यांनी पाहावं, असं संजय राऊत म्हणालेत.

फडणवीसांना टोला

महाराष्ट्रात एक फुल मुख्यमंत्री आणि दोन डाऊट फुल मुख्यमंत्री आहेत. त्यावर फडणवीसांनी बोलावं. राम मंदिर संदर्भात शिवसेनेचे योगदान काय आहे? हे जगातला प्रत्येक व्यक्ती जाणतो. तेव्हा फडणवीस गोधडीत होते. रांगत होते. मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी या पळकुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिराच्या योगदानावर प्रश्न विचारावे ही संघनीती आहे. स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्यांच्या शौर्यावर बोट दाखवायचं हा रामाचा अपमान करत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

राम मंदिराच्या जागेवर भाष्य

भाजपचा नारा होता मंदिर वहीं बनायेंगे. पण ज्या ठिकाणी मंदिर बांधायची चर्चा होती. त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलेलं नाही. ज्या ठिकाणी राम मंदिर बनवायचे होते. त्या ठिकाणाहून चार किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधण्यात आले आहे. ती जागा अजूनही तशीच आहे, असं संजय राऊत म्हणाले.

उद्या चार वाजता वरळीत उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडितांची महापत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे. त्या संदर्भात खुली चर्चा होईल. आपण सर्वांनी तिथे यावं, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.