जन्मदिन साजरा करण्यापूर्वीच तरुणाचा खून, 2 मित्रांना अटक

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बुलडाणा : खामगावमध्ये आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना घडली. वाद झाल्याने सोबत आलेल्या मित्रांनीच तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यामुळे खामगाव शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील नगर परिषद मैदानावर घडली. विकी हिवराळे असे मृत तरुणाचे नाव आहे. संजीवनी कॉलनीमधील 28 वर्षीय युवक विकी हिवराळे याचा काल (गुरुवारी) […]

जन्मदिन साजरा करण्यापूर्वीच तरुणाचा खून, 2 मित्रांना अटक
Follow us

बुलडाणा : खामगावमध्ये आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना घडली. वाद झाल्याने सोबत आलेल्या मित्रांनीच तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यामुळे खामगाव शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील नगर परिषद मैदानावर घडली. विकी हिवराळे असे मृत तरुणाचे नाव आहे.

संजीवनी कॉलनीमधील 28 वर्षीय युवक विकी हिवराळे याचा काल (गुरुवारी) जन्मदिन होता. तो रात्री जन्मदिन साजरा करण्यासाठी आपल्या मित्रांसह खामगावमधील नगर परिषदेच्या मैदानावर आला होता. मात्र, रात्री 12 वाजताच्या सुमारास पार्टी सुरु होण्याआधीच या ठिकाणी वाद झाला. हा वाद वाढला आणि वादाचे पर्यावसन थेट विकी हिवराळेच्या खुनात झाले. विकीच्या पोटावर, पाठीवर आणि मांडीवर जवळपास 19 सुरीचे वार करण्यात आले. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन विकीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार पोलिसांनी हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला. घटनास्थळावरून आरोपी फरार झाले होते. सुरुवातीला याप्रकरणी पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध खुनाचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळावर जन्मदिन साजरा करण्यासाठी आणलेले केक, दारूच्या बाटल्या आणि सूरी आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच आपली तपासचक्रे फिरवली आणि रात्रीच एका आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या हत्येप्रकरणी विकी हिवराळेच्या 3 मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. फरार आरोपीचा शोध सुरु आहे. न्यायालयाने अटक केलेल्या दोघांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनू घाटर्डे, राहुल घेलूनदे, आणि संदीप उर्फ मोगली सारसर अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही आरोपी खामगावच्या शंकरनगर भागात राहतात. यातील संदीप सारसर याला राहत्या घरातून आणि  राहुल घेलूनदे याला मेहकर येथून अटक करण्यात आली. यातील सोनू घाटर्डे हा अद्यापही फरार आहे.

‘मृत विकी हिवराळे कुख्यात गुन्हेगार’

या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विकी हिवराळे हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खामगावसह इतर काही पोलीस स्टेशनमध्ये विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कुख्यात गुन्हेगाराचा जन्मदिनाच्या दिवशीच अंत झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI