मनसेचा दणका, नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत

| Updated on: Dec 07, 2020 | 12:39 PM

मनसेच्या निवेदनानंतर रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 022-2756 73 89 हा हेल्पलाईन नंबर तसेच 720 849 0010 हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरु केला आहे.

मनसेचा दणका, नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत
Follow us on

नवी मुंबई : मनसेने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटलांनी रुग्णांकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली जादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 32 लाख रुपये हॉस्पिटलने परत केल्याचे समोर आले आहे. (Navi Mumbai Private Hospitals returns 32 Lakh extra bills to Corona Patients after MNS slams)

पी. के. सी हॉस्पिटल (वाशी), एम. पी. सी. टी हॉस्पिटल (सानपाडा), एम. जी. एम. हॉस्पिटल (बेलापूर), फोर्टिस हॉस्पिटल (वाशी), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेरुळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरुळ) तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरुळ) या हॉस्पिटलांनी रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिलाचे एकूण 32 लाख रुपये आतापर्यंत परत केले.

याबाबत महापालिकेने मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तसेच कोव्हिड काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या आतापर्यंतच्या संपूर्ण बिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सात दिवसांत हॉस्पिटलच्या बिलांच्या तक्रारीबाबत पडताळणी करुन जादा आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करणे अथवा हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मनसेच्या निवेदनानंतर रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 022-2756 73 89 हा हेल्पलाईन नंबर तसेच 720 849 0010 हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरु केला आहे.

शहरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. मात्र या खाजगी हॉस्पिटलकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट होत अनेकदा तक्रारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 4 सप्टेंबर 2020 रोजी भेटून लेखी निवेदन दिले होते.

यावेळी रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर ठोस कारवाई करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली होती. सात दिवसांत ठोस कारवाई झाली नाही तर खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून आयुक्तांना पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने यावेळी दिला होता.

“मनसेचा हा मोठा विजय असून जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा खाजगी हॉस्पिटलच्या लूटमारी विरोधातला लढा सुरुच राहील. तूर्तास आम्ही आयुक्त अभिजित बांगर यांच्या विनंतीवरुन आमचे आंदोलन स्थगित करत आहोत” अशी माहिती नवी मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली. (Navi Mumbai Private Hospitals returns 32 Lakh extra bills to Corona Patients after MNS slams)

संबंधित बातम्या :

खाजगी हाॅस्पिटलने भरमसाठ बिलासाठी दादागिरी केल्यास धडा शिकवू, नवी मुंबई मनसेचा इशारा

CORONA | नवी मुंबईत ICU बेड्सची संख्या वाढवा, मनसेचं पालिका आयुक्तांना पत्र

(Navi Mumbai Private Hospitals returns 32 Lakh extra bills to Corona Patients after MNS slams)