रुतलेले अर्थचक्र रुळावर, महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम

| Updated on: May 11, 2020 | 2:29 PM

पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने मिळाले आहेत. त्यापैकी 5 हजार 774 कंपन्यांनी उत्पादन सुरु केले आहे. (Orange Green Zone Companies in Maharashtra gets Permission)

रुतलेले अर्थचक्र रुळावर, महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम
Follow us on

मुंबई : ‘कोरोना’ संकटामुळे रुतलेले अर्थचक्र हळूहळू रुळावर येण्याच्या मार्गावर आहे. रेड झोन वगळता सध्या महाराष्ट्रात 57 हजार 745 उद्योगांना परवाने मिळाले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरु केले आहे. त्यामुळे जवळपास साडेसहा लाख कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. (Orange Green Zone Companies in Maharashtra gets Permission)

उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. राज्यात 25 हजार कंपन्या सुरु झाल्या असून त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने आयोजित वेबीनारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा : चाकणमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्या सज्ज, नियम-अटी पाळून काम सुरु करणार

पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने मिळाले आहेत. त्यापैकी 5 हजार 774 कंपन्यांनी उत्पादन सुरु केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मेअखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, आपली पहिली लढाई कोरोनासोबत आहेत. त्यामुळे थोडी घाई करु नये, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले.

वीज बिलात सवलत

स्थिर वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले. (Orange Green Zone Companies in Maharashtra gets Permission)

लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज देणार

राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरु असल्याचं देसाई यांनी सांगितलं. याशिवाय राज्य शासन लघु उद्योगांना इतर सुविधा पुरवण्याबाबत धोरण ठरवत आहे.

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वाटाघाटी

राज्यात परदेशी गुंतवणूक यावी, यासाठी वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. अनेक देश महाराष्ट्राकडे चौकशी करत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पुढील काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरु होणार असल्याने लघु उद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज रहावे, अशी ग्वाही सुभाष देसाई यांनी दिली.