प्रवासी ट्रॅव्हल्समधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक, सापळा रचत 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

| Updated on: Nov 29, 2020 | 8:04 AM

या कारवाईत साडेसहा लाखांचा गुटखा, लक्झरी बस आणि टेम्पो असा 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Panvel Police arrest Interstate gutka selling gang)

प्रवासी ट्रॅव्हल्समधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक, सापळा रचत 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Follow us on

पनवेल : मध्यप्रदेशमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करुन तो पनवेलमध्ये आणणार्‍या तिघांना पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने गजाआड केले आहे. पोलिसांनी या कारवाईत साडेसहा लाखांचा गुटखा, लक्झरी बस आणि टेम्पो असा 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Panvel Police arrest Interstate gutka selling gang)

महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असतानाही गुटखा विक्री करणारी आंतरराज्य टोळी सक्रीय असल्याची माहिती पनवेल गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले यांच्या पथकाला मध्यप्रदेश येथून एका प्रवासी लक्झरी ट्रॅव्हल्समधून अवैधरित्या गुटखा पनवेलमध्ये आणून तो टेम्पोद्वारे विविध ठिकाणी पनवेलमध्ये आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानुसार गार्डन हॉटेल पनवेल येथे सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथून लक्झरी ट्रॅव्हल्समधून आणलेला गुटखा घेऊन जाणारा टेम्पो मिळाला. या टेम्पोमध्ये 6 लाख 68 हजार 320 रुपये किमतीचा ‘विमल’ व ‘राजश्री’ गुटखा सापडला. पोलिसांनी हा गुटखा तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो आणि लक्झरी बस असा एकूण 61 लाख 68 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा मानदे अधिनियम कलम 26, 27, भा.दं.वि. कलम 188, 272, 273, 328 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुटखा मागविणारा इर्शाद सैजुद्दीन अन्सारी (32), टेम्पो चालक राज रामा साळुंखे (38) आणि लक्झरी बसचालक अश्फाक कालू खा. व्हिले दुधी यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी ‘नशा मुक्त नवी मुंबई अभियाना’दरम्यान गुटखा आणि इतर नशेसाठी वापरणाऱ्या पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल परिसरात लक्झरी बससह, टेम्पोवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत केला आहे. (Panvel Police arrest Interstate gutka selling gang)

संबंधित बातम्या : 

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

दुबईचं सीमकार्ड वापरत बंगळुरुतून रॅकेट ऑपरेट, नवी मुंबई पोलिसांची आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक