दुबईचं सीमकार्ड वापरत बंगळुरुतून रॅकेट ऑपरेट, नवी मुंबई पोलिसांची आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक

भाड्याने लावण्याच्या बहाण्याने गाड्या ताब्यात घेऊन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 20:38 PM, 27 Nov 2020

नवी मुंबई : भाड्याने लावण्याच्या बहाण्याने गाड्या ताब्यात घेऊन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भोईसर आणि बंगळुरु येथे कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 20 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. आशिष पुजारी उर्फ अँथोनी पॉल, सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू, अयान उर्फ अँथोनी पॉल छेत्तीयार, मोहम्मद वसीम मोहम्मद फरीद शेख आणि जावेद अब्दुलसत्तार शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत (Navi Mumbai police arrest inter state gang of vehicle thieves in Navi Mumbai).

या टोळीकडून फसवणूक करून चोरलेल्या 2 कोटी 2 लाख रुपये किमतीच्या महागड्या 20 गाड्या जप्त केल्या आहेत. यापैकी काही गाड्या दमन येथे दारूच्या तस्करीसाठी वापरल्या जात होत्या. हॉटेल किंवा कंपनीमध्ये भाड्याने लावण्यासाठी या गाड्या घेतल्या जायच्या. सुरुवातीचे दोन ते तीन महिने नियमित भाडे द्यायचे. मात्र त्यानंतर कार्यालय बंद करून पळ काढायचे.

नेरुळ येथे असाच गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले. यानंतर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) बी.जी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. यात वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, निलेश तांबे, संजय पवार, उर्मिला बोराडे, लक्ष्मण कोरकर, राहुल वाघ, विजय खरटमोल, किरण राऊत, मिथुन भोसले, नितीन जगताप, प्रकाश साळुंखे, मेघनाथ पाटील, विष्णू पवार, पोपट पावरा, आतिष कदम, सतीश सरफरे, सचिन टिके, सतीश चव्हाण आणि रुपेश कोळी या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

“कारवाईसाठी पोलिसांनी आरोपीच्या इमारतीत फ्लॅट घेतला, बंगळुरुच्या हॉटेलमध्ये वेटरही झाले”

मुख्य आरोपी आशिष पुजारी उर्फ अँथोनी पॉल हे सर्व रॅकेट बंगळुरुमधून ऑपरेट करत होता. आरोपी पोलीस पथकाची दिशाभूल करण्यासाठी दुबईचं सीमकार्ड वापरत होता. क्राईम ब्रँच पथकाने या टोळीला पकडण्यासाठी ज्या इमारतीमध्ये आरोपी राहत होते त्याच इमारतीमध्ये फ्लॅट घेतले आणि आरोपीला अटक केली. तसेच मुख्य आरोपीला पॉलला अटक करण्यासाठी बंगळुरुच्या एका हॉटेलमध्ये वेटर पण बनले होते. या कारवाईनंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी पोलीस पथकाचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे.

हेही वाचा :

चोरीच्या घटनेतील सराईत आरोपीला अटक, नवी मुंबई पोलिसांना मोठं यश

नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये मोठा घोटाळा; 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन पैसे लाटल्याचा प्रकार उघड

भाजीपाल्याचे दर घसरले, ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र फटका बसण्याची शक्यता

Navi Mumbai police arrest inter state gang of vehicle thieves in Navi Mumbai