या सरकारने माझी 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केली : विजय मल्ल्या

या सरकारने माझी 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केली : विजय मल्ल्या

नवी दिल्ली : कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याने आपली 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केलाय. विजय मल्ल्या विविध बँकांचं नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळाला. त्याला भारतात आणण्याचाही मार्ग आता मोकळा झालाय. पण नऊ हजार कोटींचं कर्ज असताना 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा मल्ल्याने केला.

माझ्यासोबत अन्याय झाला असल्याचं विजय मल्ल्याने म्हटलंय. दररोज सकाळी उठतो तेव्हा एक नवी संपत्ती जप्त केल्याचं कळतं. बँकांच्या कर्जाची व्याजासह रक्कम अगोदरच वसूल झाली आहे. पण अजून हे किती दिवस चालणार आहे आणि त्यापुढे काय असेल? असा सवाल विजय मल्ल्यान केलाय. एकापाठोपाठ ट्वीट करत त्याने हे दावे केलेत.

एवढी संपत्ती जप्त करुनही बँकांनी माझ्याविरोधात लढण्यासाठी इंग्लंडमध्ये त्यांचे वकील दिले आहेत. या वकिलांकडून नको ते आरोप केले जात आहेत. या कायदेशीर प्रक्रियेवर लोकांचा जो पैसा खर्च केला जातोय त्याला जबाबदार कोण आहे, असं म्हणत विजय मल्ल्याने सरकारला सवाल करण्याचा प्रयत्न केलाय.

एवडी संपत्ती तर जप्त केली आहेच, पण भारतातलं कर्ज चुकवण्यासाठी माझ्याकडे ब्रिटनमध्येही पैसे मागितले जात आहेत. हे सर्वात मोठं दुर्दैवं आहे, असंही विजय मल्ल्या म्हणालाय.

विजय मल्ल्यावर विविध बँकांचं नऊ हजार कोटींचं कर्ज आहे. कर्ज देण्यास असक्षम ठरल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला. इंग्लंडमधील वेस्टमिन्सटर कोर्टाने विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी परवानगी दिली आहे. पण मल्ल्या वरिष्ठ न्यायालायत या निर्णयाला आव्हान देणार आहे. वरिष्ठ न्यायालयात प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच मल्ल्याला भारतात आणलं जाईल.

Published On - 1:53 pm, Fri, 1 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI