पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 800 पार, रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’

| Updated on: Apr 21, 2020 | 2:56 PM

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 800 पार गेला आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ख्याती असलेल्या रुबी हॉल क्लिनिकच्या 25 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे (Pune corona patients update).

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 800 पार, रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचाऱ्यांना कोरोना
Follow us on

पुणे : राज्यात कोरोनाचं थैमान वाढत चाललं आहे (Pune corona patients update). पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 800 पार गेला आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ख्याती असलेल्या रुबी हॉल क्लिनिकच्या 25 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 16 नर्स, 3 डॉक्टर आणि इतर 6 कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. रुबी हॉल क्लिनिक हे फक्त पुण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या रुग्णालयांपैकी एक रुग्णालय मानलं जातं. मात्र, याच रुग्णालयातील तब्बल 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे (Pune corona patients update).

या सर्व कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट काल (20 एप्रिल) रात्री उशिरापर्यंत समोर आले. या नव्या रुग्णांमुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 803 वर पोहोचला आहे. याअगोदरही पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील काही नर्सचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे इतर 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता प्रशासनापुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या 25 कर्मचाऱ्यांच्या सहवासात किती लोक आले आहेत, याची माहिती घेण्याचं काम प्रशासन करत आहे.

पुण्यात सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे रुबी हॉल क्लिनिकमधील इतर रुग्णांना खबरदारी म्हणून लवकर डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता डॉक्टर आणि नर्सेस यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकचे नवे 25 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ससून, नायडू आणि भारती रुग्णालयांमधील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आता काही खाजगी रुग्णालयांच्या शोधात आहे. सध्या ससूनमध्ये 100, नायडूत 120 आणि भारती रुग्णालयात 135 बेड्सची व्यवस्था आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे रुगणालयांमधील बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. खासगी रुग्णालये मिळाले नाहीत तर प्रशासनाकडून वसतिगृहही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 हजारचा टप्पा ओलंडला आहे. तर एकट्या पुण्यात कोरोनाचे 803 रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 20 एप्रिलपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात आलं आहे. पुढील सात दिवस पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील या 5 तालुक्यातील ही 27 गावे आता पूर्णपणे सील करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या :

Pune Corona Update : पुण्यात ससून, भारती आणि नायडू रुग्णालयातील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल

CISF च्या जवानांनी कोरोनाला गाडलं, 6 जवान कोरोनामुक्त, पनवेलमध्ये 10 जणांना डिस्चार्ज