पुण्यात ‘कोरोना’ग्रस्त महिलेच्या पार्थिवावर महापालिकेकडून तीन दिवसांनी अंत्यसंस्कार

| Updated on: Apr 08, 2020 | 9:09 AM

महिलेच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तीन दिवसांनी अंत्यसंस्कार केले (Pune Corona Patient Last Rites)

पुण्यात कोरोनाग्रस्त महिलेच्या पार्थिवावर महापालिकेकडून तीन दिवसांनी अंत्यसंस्कार
Follow us on

पुणे : पुण्यात ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या महिलेवर महापालिका प्रशासनाने तीन दिवसांनी अंत्यसंस्कार केले. कुटुंबातील इतर व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याने त्यांना अंतिम निरोप देता आला नाही. (Pune Corona Patient Last Rites)

येरवड्यात राहणाऱ्या कोरोनाग्रस्त महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या महिलेच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे कोणीही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येऊ शकले नाहीत.

कुटुंबियांनी पुणे महापालिकेला लेखी परवानगी दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा : नागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली

दरम्यान, पुण्यात काल रात्री आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. काल एका दिवसातच पुण्यात चौघांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी तिघांचा मृत्यू तर सकाळी नऊ ते अकरा या दोन तासांच्या वेळेत झाला. पुण्यात एकूण 134 कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात 5 एप्रिललाही 24 तासात तीन कोरोनाग्रस्त मृत्युमुखी पडले होते.

राज्यात एकूण ‘कोरोना’बळींचा आकडा 64 वर गेला आहे. कालच्या दिवसात महाराष्ट्रात 12 कोरोनाबाधित रुग्ण दगावले. राज्यात काल कोरोनाच्या 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1018 झाली आहे.

कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेला फक्त चारच खांदेकरी

कॅलिफोर्नियाहून साताऱ्यात आलेल्या 63 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुषावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नातेवाईक येऊ शकले नाहीत. अंत्ययात्रेसाठी फक्त चार लोक खांदा देण्यासाठी उपस्थित होते. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. पण 14 दिवसानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 6 एप्रिलला पहाटे रुग्णाचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नंतर मात्र तो कोरोनाग्रस्त असल्याचं निदान झालं.