पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला, बीडच्या कुुटुंबावर दुःखाचा डोंगर

नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे काही क्षणातच दोन वर्षांचा संस्कार साबळे नाल्यात दिसेनासा झाला.

पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला, बीडच्या कुुटुंबावर दुःखाचा डोंगर
| Edited By: | Updated on: Feb 13, 2020 | 6:52 PM

पुणे : पुण्यातील सिंहगड परिसरात घराबाहेर खेळताना नालात पडलेल्या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. (Pune Boy Drain Death) नाल्यात पडल्याने कालपासून बेपत्ता असलेल्या चिमुरड्याचा शोध घेणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती निराशा आली. 22 तासांनंतर दोन वर्षांच्या संस्कार साबळेचा मृतदेह आढळला.

बीडहून सूर्यकांत साबळे काही कामानिमित्त पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा संस्कार यांच्यासोबत पुण्यात आले होते. गेल्या काही महिन्यापासून साबळे कुटुंब सिंहगड रोडवरील रक्षालेखा सोसायटीच्या परिसरात राहत होतं.

चिमुरडा संस्कार काल संध्याकाळी (बुधवार 12 फेब्रुवारी) साडेपाच वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो नाल्यामध्ये पडला. नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे काही क्षणातच तो दिसेनासा झाला.

नाल्यात राडारोडा आणि आजूबाजूला झाडे पडली असल्याने शोधकार्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे काल रात्री शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज (गुरुवारी) सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं.

सकाळपासून अग्निशमनच्या दोन गाड्या आणि एक रेस्क्यू व्हॅनच्या साह्याने शोध सुरु (Pune Boy Drain Death) होता. मात्र दुर्दैवाने चिमुरड्याचा मृत्यू झाला.