‘मजुरी करायला का जुंपता, यासाठी एवढं शिक्षण घेतलंय का?’ तरुणाच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…

| Updated on: Jun 24, 2020 | 5:07 PM

रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील तरुणांना पुण्यातील कंपन्यांमध्ये असलेल्या कामाच्या संधी घेण्याचं आवाहन केलं (Rohit Pawar answer twitter user on employment).

मजुरी करायला का जुंपता, यासाठी एवढं शिक्षण घेतलंय का? तरुणाच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणतात...
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत महाराष्ट्रातील तरुणांना पुण्यातील कंपन्यांमध्ये असलेल्या कामाच्या संधी घेण्याचं आवाहन केलं (Rohit Pawar answer twitter user on employment). मात्र, त्यावर एका तरुणाने आक्षेप घेतला. तसेच रोहित पवारांना आम्हाला मजुरी करायला का जुंपता, यासाठी इतकं शिक्षण घेतलंय का? असा सवाल केला. यावर रोहित पवार यांनी या तरुणाची भावना समजून घेत समर्पक उत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी मंगळवारी (23 जून) राज्यातील मराठी तरुणांना पुण्यात स्थलांतरित मजूर परत येत असल्याचं सांगत तातडीने कंपन्यांमध्ये काम करण्याचं आवाहन केलं होतं. ते म्हणाले, “पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळं येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळं मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण अजून देण्याची गरज आहे. कोणतंही काम लहान-मोठं नसतं.”

यावर ट्विटरवर एका तरुणाने रोहित पवार यांनाच सवाल केला. तो म्हणाला, “अहो आम्हाला मजुरी करायला कशाला जुंपत आहात? कामगार होण्यासाठी एवढं शिक्षण घेतलय का आम्ही? प्रलंबित नोकरभरती चालू करा. आम्ही फॉर्म भरुन 18 महिने झाले.” यावर रोहित पवार यांनी अगदी संयमीपणे या तरुणाची भावना समजून घेत उत्तर दिले.

रोहित पवार म्हणाले, “सगळेच तरुण आपल्यासारखे उच्चशिक्षित नाहीत. प्रत्येकाला शिक्षण/क्षमता/अनुभव यानुसार नोकरी पाहिजे असते. आपणही काळजी करु नका, येत्या काळात महाराष्ट्र विकास आघाडी (मविआ) सरकारकडून युवांबाबत अनेक चांगली धोरणे राबवली जातील. तसंच फक्त नोकर भरतीने प्रश्न सुटणार नाहीत, तर युवांनी उद्योजकतेकडेही वळणं आवश्यक आहे.”


सामान्यपणे अनेक नेते आपल्या ट्विटवर सामान्यांच्या काय प्रतिक्रिया येतात याकडे फारसं लक्ष देत नाहीत. दिलं तरी अडचणीत टाकणारा प्रश्न असेल तर त्याला उत्तर देणं किंवा त्याची दखल घेणंही टाळतात. मात्र, रोहित पवार यांनी या सामान्य तरुणाचा प्रश्न समजून घेत त्याच्या प्रश्नाला दिलेलं हे समर्पक उत्तर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

“शेतकऱ्यांना कर्ज देताना खासगी बँकांच्या अडवणुकीकडे गांभीर्याने लक्ष द्या”

दरम्यान, रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना खासगी बँकांच्या अडवणुकीकडे गांभीर्याने लक्ष द्या, अशी मागणी रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मविआ सरकारने बँकांसोबत बैठक घेतल्यानंतर बऱ्यापैकी बँका शेतकऱ्यांना कर्ज देतायेत,पण अजूनही काही राष्ट्रीयीकृत बँका सहकार्य करत नाहीत. यापूर्वी खासगी बँकांनीही EMI संदर्भात अडवणुकीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, ही विनंती.”

हेही वाचा :

Prakash Javadekar | नागरी सहकारी बँका आरबीआयच्या कक्षेत, 8.6 कोटी ठेवीदारांना केंद्राचा दिलासा

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

भाजपसोबत सत्तास्थापन करण्यात राष्ट्रवादीचा थेट सहभाग होता का? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटील म्हणतात…

Rohit Pawar answer twitter user on employment