पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

मॉस्को : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांचे हल्ले सहन करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चांगली बातमी आहे. नरेंद्र मोदींना जगातील आणखी एका पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. रशियाने पंतप्रधान मोदींना आपला ‘सेंट एंड्रयू अवॉर्ड’ सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचं जाहीर केलंय. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही या प्रस्तावावर सही केली आहे. नुकतंच संयुक्त अरब अमिरातीनेही (यूएई) मोदींना जायद पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.

रशियन दुतावासाने याबाबतची अधिकृत माहिती जारी केली आहे. 12 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा करण्यात आल्याचं रशियाने म्हटलंय. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलाय. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील. यापूर्वी हा पुरस्कार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना देण्यात आला होता.

यूएईकडूनही मोदींचा सन्मान

नुकताच यूएईनेही पंतप्रधान मोदींना जायद पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. भारत आणि यूएई या दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर नेल्याबद्दल यूएईकडून हा पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान मोदींना या पुरस्काराचं स्वागत करत यूएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन यांचे आभारही मानले होते.

दक्षिण कोरियाकडूनही मोदींना पुरस्कार

या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाने सियोल शांती पुरस्काराने सन्मानित केलं होतं. हा पुरस्कार मिळवणारे मोदी पहिलेच भारतीय व्यक्ती ठरले. मोदी हे एक वर्ल्ड लीडर म्हणून पुढे आले आहेत, शिवाय त्यांनी दक्षिण कोरिया आणि भारताचे संबंध आणखी मजबूत केले आहेत, असं द. कोरियाने म्हटलं होतं. याशिवाय मोदींना संयुक्त राष्ट्राकडूनही चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला होता.

मोदींचे परदेश दौरे विरोधकांच्या निशाण्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपद सांभाळल्यानंतर जगभरातील विविध देशांमध्ये दौरे केले आणि संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. अमेरिका, रशिया, ब्रिटन, जपान, जर्मनी, चीन या सर्व प्रमुख देशांचे दौरे करत मोदींना राजकीय आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच हे जागतिक पुरस्कार भारतासाठी मोठं यश मानलं जातात.

पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं नेहमीच कौतुक केलं आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने एकवटलं होतं. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे (UNSC) सदस्य असलेल्या देशांनीही या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानला ठणकावलं होतं. शिवाय जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्सने UNSC मध्ये प्रस्ताव आणला होता. पण याला चीनने विरोध केला. पण अमेरिकेने भारताच्या बाजूने आता नवा प्रस्ताव आणलाय, ज्याला चीनही विरोध करु शकत नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI