लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीने सलमान खान भावूक

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीने सलमान खान भावूक

मुंंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने 1988 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 1988 मध्ये ‘बीवी होतो ऐसी’ हा सलमानचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर सलमानने ‘मैने प्यार किया’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आणि या चित्रपटामुळे सलमान खान प्रसिद्ध झोतात आला. बॉक्स ऑफिसवर मैने प्यार किया चित्रपट सुपरहिट ठरला. यामध्ये सलमान खान, अभिनेत्री भाग्यश्री, रीमा लागू, अभिनेता अलोकनाथ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केलं आहे. पण या चित्रपटाच्या यशाचे सर्व क्रेडिट सलमान खानने लक्ष्मीकांत बेर्डेंना दिलं आहे.

सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं आहे. 1990 च्या दशकात गोविंदा-कादरखान, शाहरुख-जॉनी लिव्हर तसेच सलमान आणि लक्ष्मीकांत ही जोडी ठरलेली होती. सलमान आणि लक्ष्मीकांत हे चांगले मित्रही होते.

एका डान्स शोमध्ये सलमान खानने लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींना उजाळा दिला. डान्स शोमध्ये एका स्पर्धकाने ‘तुमसे मिलने की तमन्ना है’ या गाण्यावर डान्स केला. हा डान्स पाहून सलमान खान भावूक झाला.

“या गाण्यासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. हे गाणं माझ्या ‘साजन’ चित्रपटातील आहे. चित्रपटात हे माझे इंट्रोडक्शन गाणं होते. यामध्ये माझा जवळचा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही सहभाग होता. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. मला वाटतं की, ‘मैने प्यार किया’ चित्रपटाच्या यशाचे कारण लक्ष्मीकांत बेर्डे आहेत. हे गाण मला नेहमी त्यांची आठवण देते. दुर्देवाने ते आज आपल्यासोबत नाहीत”, असं सलमान खान म्हणाला.

सलमान सध्या भारत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या 5 जून रोजी त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कॅटरीना कैफ आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे.

Published On - 3:42 pm, Sat, 25 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI