बहिणीच्या आत्महत्येचा सूड, एकाच कुटुंबातील तिघींची हत्या, दोषींना आजन्म कारावास

बहिणीच्या आत्महत्येचा सूड, एकाच कुटुंबातील तिघींची हत्या, दोषींना आजन्म कारावास

सांगली : सांगली जिल्ह्यातील हिवरे गावातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आई, मुलगी आणि सून अशा एकाच कुटुंबातील तीन महिलांची साडेचार वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. बहिणीच्या आत्महत्येचा सूड घेण्याच्या भावनेने आरोपींनी (Sangli Hiware Triple Murder Verdict) हे कृत्य केलं होतं.

तिहेरी हत्याकांडातील आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम यांना मरेपर्यंत कारावास आणि एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सांगली सत्र न्यायालयाने आज (4 फेब्रुवारी) हा निकाल दिला.

जून 2015 मध्ये आरोपींनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात प्रभावती शिंदे आणि सुनिता पाटील या मायलेक जागीच ठार झाल्या होत्या, तर गंभीर जखमी झालेली सून निशा शिंदे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

आरोपी सुधीर घोरपडेची बहीण विद्याराणी हिचं लग्न हिवरे येथील शिंदे कुटुंबात झालं होतं. लग्नानंतर सासरची मंडळी विद्याराणीला त्रास देत असल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप होता. त्यानंतर विद्याराणीने आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या व्यक्तींनी विद्याराणीची हत्या केल्याची फिर्याद माहेरच्यांनी विटा पोलिस ठाण्यात दिली होती.

या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटलं होतं. शिंदे कुटुंब निर्दोष सुटल्यामुळे सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबावर चिडून होता. सूडभावनेने आरोपी सुधीर घोरपडेने आपल्या मित्रांच्या मदतीने ही हत्या केली होती. सुधीर घोरपडे, रवींद्र कदम आणि एक अल्पवयीन तरुणीने तिहेरी हत्या केल्याचा आरोप होता. न्यायालयाने सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम यांना दोषी ठरवलं होतं.

दोन्ही दोषींना मृत्युदंड देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात (Sangli Hiware Triple Murder Verdict) केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI