शरद पवारांची बळीराजाशी ‘मन की बात’; गाडी थांबवून ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

शरद पवार प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. ते प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकून घेत आहेत. | Sharad Pawar Marathwada

शरद पवारांची बळीराजाशी 'मन की बात'; गाडी थांबवून ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

उस्मानाबाद: राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी शेतकऱ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. आज तुळजापूरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. (Sharad Pawar in Marathwada)

या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली. तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली.

मराठवाड्यात उमरगा आणि लोहारा या तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या १३ वर्षांमध्ये इतक्या मोठ्याप्रमाणात पाऊस झाला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. ते प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकून घेत आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांनाही शासनाकडून आपल्याला लवकरात लवकर मदत मिळेल, अशी आशा वाटत आहे.

शरद पवार रविवार आणि सोमवार हे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तर अजित पवार हेदेखील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही नेत्यांच्या सूचनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.

संबंधित बातम्या:

LIVE | नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा उद्यापासून पाहणी दौरा

बाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Sharad Pawar in Marathwada)

Published On - 11:14 am, Sun, 18 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI