
तेलंगणा | 16 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेपूर्वीच्या मिनी निवडणुका म्हणून पाहिले गेले होते. पाच राज्यांपैकी तीन मोठी राज्ये भाजपकडे गेली. तर, तेलंगणा राज्यात कॉंग्रेसने सत्ताबदल करून दाखविला. हा सत्ताबदल होताच तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरवात केली होती. मात्र, आता त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनाच खुले आव्हान दिलंय.
एकीकडे देशात निवडणुकीचे वातावरण आहे तर दुसरीकडे ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचेही आयोजन करण्यात येत आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारनेही हैदराबादमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि AIMIM प्रमुख, हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे या पार्टीत समील झाले होते. यावेळी हे दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसले.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यावेळी बोलताना त्यांचे सरकार मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाचे संरक्षण करेल अशी ग्वाही दिली. अविभाजित आंध्र प्रदेशातील काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, हे आरक्षण रद्द करण्याबाबत एक विधान केले होते. त्यावरून रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली.
इफ्तार कार्यक्रमात बोलताना रेड्डी म्हणाले, अविभाजित आंध्र प्रदेशातील काँग्रेस सरकारने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले होते. मला अमित शहाजींना सांगायचे आहे की तेलंगणात काँग्रेसचे सरकार आहे. मुस्लिमांना दिलेले चार टक्के आरक्षण संपवण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यात नाही. काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी चांगल्या वकीलांची नियुक्ती केली होती. त्यामुळेच 4% आरक्षण मिळाले आहे. त्याचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे, असे रेड्डी यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमचे सरकार हे धर्मनिरपेक्ष सरकार आहे. हिंदू आणि मुस्लिम हे त्यांच्यासाठी ‘दोन डोळ्यांसारखे’ आहेत. महत्त्वाच्या सरकारी पदांवर नियुक्तींमध्ये मुस्लिमांना संधी देत आहे. कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अल्पसंख्याकांचा न्याय्य वाटा निश्चित करत आहे. भविष्यातही अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी सरकार चांगल्या योजना आणणार आहे असेही मुख्यमंत्री रेड्डी यांनी यावेळी सांगितले.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी बोलताना रेड्डी यांच्या सरकारमध्ये तेलंगणात ‘गंगा-जमुनी संस्कृती’ अधिक मजबूत होईल, अशी आशा व्यक्त केली. मुख्यमंत्री तेलंगणाला मजबूत करतील आणि ते अधिक सुंदर करतील. तेलंगणात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात त्यांचा पक्ष रेड्डी सरकारसोबत लढणार आहे. द्वेष पसरवणाऱ्या आणि घर तोडणाऱ्यांचा मुकाबला करून तेलंगणाला आणखी मजबूत केले पाहिजे. यावेळी अनेक राज्यमंत्री, माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.