ब्रिटनच्या गृहमंत्रालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी

ब्रिटनच्या गृहमंत्रालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी
विजय माल्ल्या

लंडन : कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनने अधिकृतपणे परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या गृह सचिवांकडून प्रत्यार्पणावर स्वाक्षरी करण्यात आली. विजय मल्ल्याकडे आता वरच्या न्यायालयात आव्हान देण्याचाही पर्याय आहे. इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती.

विजय मल्ल्याचं प्रत्यार्पण हा भारतासाठी जागतिक पातळीवर मोठा विजय आहे. भारतीय संस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी इंग्लंडच्या कोर्टात लढा देत आहेत. विजय मल्ल्याविरोधातील केस भारतीय संस्थांनी जिंकली आणि त्याला भारतात आणण्यासाठी मंजुरी मिळाली.

वाचाया सरकारने माझी 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केली : विजय मल्ल्या

विजय मल्ल्या आता ब्रिटनच्या हायकोर्टात या निर्णयाविरोधात याचिका दाखल करु शकतो. मल्ल्याकडे याचिका दाखल करण्यासाठी अजून 14 दिवस आहेत. वरिष्ठ न्यायालयानेही याचिका फेटाळल्यास विजय मल्ल्याला भारतात यावंच लागेल.

विजय मल्ल्यावर विविध बँकांचं नऊ हजार कोटींचं कर्ज आहे. कर्ज देण्यास असक्षम ठरल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला. इंग्लंडमधील वेस्टमिन्सटर कोर्टाने विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी परवानगी दिली आहे. पण मल्ल्या वरिष्ठ न्यायालायत या निर्णयाला आव्हान देणार आहे. वरिष्ठ न्यायालयात प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच मल्ल्याला भारतात आणलं जाईल.

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या मते, विजय मल्ल्याला ब्रिटन सरकारच्या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात आव्हान देण्याचा अधिकार आहे. पण ही फक्त पळवाट असेल. कारण, भारतीय संस्थांकडे त्याच्याविरोधात कागदोपत्री पुरावे आहेत आणि भारताची बाजू मजबूत आहे. त्यामुळे मल्ल्या आता भारतीय कायद्याच्या कचाट्यातून वाचणं अशक्य आहे.

Published On - 9:39 pm, Mon, 4 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI