कोरोना व्हायरस पळवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या जाळल्या, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

पुण्यासह कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्यासह सर्वच विभाग कामाला लागले आहेत (Unscientific killing of Corona virus in Osmanabad).

कोरोना व्हायरस पळवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या जाळल्या, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

उस्मानाबाद : पुण्यासह कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्यासह सर्वच विभाग कामाला लागले आहेत (Unscientific killing of Corona virus in Osmanabad). त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना अनेक सतर्कतेच्या सुचना करण्यात येत आहेत. मात्र, उस्मानाबादमध्ये अजब प्रकार पाहायला मिळाला. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू पळवण्यासाठी चक्क शेणाच्या गोवऱ्या आणि धूप जाळल्याचा प्रकार घडला. यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आजाराची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याचवेळी शेणाच्या गोवऱ्या आणि धूप जाळण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी खुद्द जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी पत्रकारांना हे प्रात्यक्षिक करुन दाखवलं.

कोरोना व्हायरस पळवण्यासाठी हे प्रात्यक्षिक केल्याची कबुली यावेळी प्रात्यक्षिक करण्याऱ्या डॉक्टरांनी दिली. मात्र, हा प्रकार पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सारवासारव केली. कोरोना व्हायरसवर कसं नियंत्रण करायचं आणि काय उपाययोजना कराव्यात याची माहिती देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात शेणाच्या गोवऱ्या आणि धूप जाळल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करता येतो असा अजब दावा आयुर्वेदिक महाविद्यालयाने केला.

शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भांड्यात शेणाच्या गोवऱ्याचे तुकडे आणि विविध आयुर्वेदिक वनस्पती आणि त्यामध्ये कापूर टाकून या मिश्रणाचा धूर करण्यात आला. या धुराने विषाणू मरतात आणि हवा स्वच्छ होते असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं. दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी कोरोना रोखण्यासाठी या प्रात्यक्षिकाचा उपयोग होत नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच कोरोनासाठी हे प्रात्यक्षिक केल्याचं मान्य केलं.

Unscientific killing of Corona virus in Osmanabad

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI