दहावी नापास तरुणांकडून पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक, तब्बल दोन कोटी उकळले

मसुरीमध्ये दहावी नापास मुलांनी भातरासह परदेशात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे.

  • Updated On - 4:31 pm, Sat, 16 January 21 Edited By: Team Veegam
दहावी नापास तरुणांकडून पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक, तब्बल दोन कोटी उकळले

गाझियाबाद : मसुरीमध्ये दहावी नापास मुलांनी भातरासह परदेशात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे (Online Fraud From Tenth Failed). या मुलांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करुन त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये उकळल्याचं समोर आलं आहे. मसुरी पोलिसांनी डासनामधील शक्ती नगर येथील या प्रकरणातील तिघांना अटक केली आहे. हे तीनही आरोपी एका खोलीतून फसवणुकीचं मोठं रॅकेट चालवत होते. पोलीस या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत (Online Fraud From Tenth Failed).

या तीन आरोपींकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप, काही पासबुक, 11 एटीएम कार्ड आणि इतर काही सामान जप्त केलं आहे.

पोलिसांना एका खबऱ्याने शक्ती नगर परिसरात फसवणूक करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. या परिसरात एका खोलीत काही तरुण कम्प्युटरच्या माध्यमातून बेकायदेशीर काम करत असल्याचं खबरीने सांगितलं. या माहितीवरुन पोलिसांनी धाड टाकली.

यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली. पुनीत कुमार, परवेज आणि चंद्रशेखर असं या फसवणूक करणाऱ्यांचं नाव आहे.

हे आरोपी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रिसर्च पेपर इंटरनेशनल जनरलमध्ये छापून आणण्याचं आमिष देऊन फसवणूक करत होते. यामध्ये भारतासह नोर्व्हे, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, पाकिस्तान येथील विद्यार्थ्यांना या आरोपींनी गंडवलं आहे.

विद्यार्थ्य़ांची फसवणूक करण्यासाठी या आरोपींनी वेबसाईट बनवली होती. ते नेहमी वेबसाईट बदलत राहायचे. सध्या ते www.ijhss.org या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांची फसवणूक करत होते. रिसर्च छापून आणण्याच्या नावावर ते विद्यार्थ्यांकडून 50-100 डॉलर उकळत होते. याप्रकारे या आरोपींनी विद्यार्थ्यांची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली.