
ठाकरे गटाचे नेते, खसादार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून भाजपच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. नितीन गडकरींचा पराभवा करण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. त्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या आरोपांना काँग्रेस नेत्याने उत्तर दिलं आहे. आमदार विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचे आरोप फेटाळले आहेत. विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली आहे. संजय राऊतांनी ‘रसद पुरवल्याचा’ आरोप फडणवीसांवर केला. त्यावर विकास ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय.
संजय राऊत यांनी वायफळ बळबळ करु नये. नागपूरात काँग्रेस एकजूटीनं लढली. मला फडणवीस यांनी रसद पुरवली, असं संजय राऊत यांनी पुरावे द्यावेत. अन्यथा मी न्यायालयात जाणार आहे. संजय राऊत यांच्या विरोधात आजच हायकमांडकडे तक्रार करणार आहे. संजय राऊत बालिशपणाने बोलतात. संजय राऊत यांनी आपलं पाहावं, इकडे लक्ष देऊ नये. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळावा. अन्यथा मी देखील संजय राऊत यांच्यावर खूप बोलेल, असं विकास ठाकरे म्हणालेत.
मी कुणाची रसद घेण्यासाठी भि@# नाही. आतापर्यंत अनेकदा निवडणूक लढली आहे. यंदाची ही निवडणूक नववी निवडणूक लढलो आहे. मी निवडणूक जिंकेल, असा विश्वास आहे. जिंकल्यानंतर संजय राऊत यांना भेटणार आहे. तुम्ही महाविकास आघाडीत आहात. मग नितीन गडकरी यांचं कौतुक का करता? तुम्ही आघाडीचा धर्म पाळावा, असंही विकास ठाकरे म्हणाले.
आम्ही इथे भाजपाशी झगडतो आणि महाविकास आघाडीतील एक पक्ष असा बोलत असेल. तर काँग्रेसने महाविकास आघाडीत राहण्याबाबत विचार करावा. काँग्रेसची भुमिका नितीन गडकरी यांच्या बाजूनं आहे का? हे मी हायकमांडला विचारणार आहे, असं विकास ठाकरे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरातून मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पक्षातूनच प्रयत्न झाल्याचं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला गडकरींविरोधात निवडणूक लढलेले विकास ठाकरे यांनी उत्तर दिलंय.