मार्गशीर्षमध्ये पंढरीच्या मंदिरातील विठूराया विष्णूपदावर का जातो?

मार्गशीर्षमध्ये पंढरीच्या मंदिरातील विठूराया विष्णूपदावर का जातो?

पंढरपूर : 28 युगांपासून कर कटेवर ठेऊन विटेवर भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला श्री विठूराय दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात वास्तव्यास असतो. पंढरीच्या मंदिरातील विठूराय कशासाठी महिनाभर इथे थांबतात याबद्दल आम्ही जाणकारांकडून जाणून घेतलंय. पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास विष्णू पद म्हणून ओळखले जाते. यामागे पद्म पुराणात […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

पंढरपूर : 28 युगांपासून कर कटेवर ठेऊन विटेवर भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला श्री विठूराय दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात वास्तव्यास असतो. पंढरीच्या मंदिरातील विठूराय कशासाठी महिनाभर इथे थांबतात याबद्दल आम्ही जाणकारांकडून जाणून घेतलंय.

पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास विष्णू पद म्हणून ओळखले जाते. यामागे पद्म पुराणात अख्यायिका सांगितली जाते. जेव्हा रूक्मिणी देवी देवावर रूसून दिंडीर वनात आली, तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले, ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक विष्णूपद..

या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची खूण आणि काल्याच्या वाडग्याची खूण सुद्धा आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची मूर्ती कोरली आहे.

या ठिकाणी विठूरायाने आपले संवगडी आणि गाईसह क्रीडा केल्या. येथेच त्या सर्वांनी भोजन केल्याचंही बोललं जातं. तेव्हा या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटल्याची अख्यायिका आहे. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णूपद असं नाव मिळालं. मार्गशीर्ष महिन्यात देव या ठिकाणी राहायला येतात असं मानलं जातं. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविकांची दर्शनास गर्दी होते.

अनेक भाविक नौकानयनाचा आनंद घेत विष्णूपदावर येतात. पंढरपूरकर भाविक डबे घेऊन या ठिकाणी येतात. दर्शन करून नंतर वनभोजनाचा आनंद लुटतात. मार्गशीर्षमध्ये पंढरपुरात वारीला आलेल्या वारकरी दिंड्याही बारस सोडायला या ठिकाणी येतात.

मार्गशीर्ष अमावस्येस देव परत पंढरपुरातील मंदिरात परततात अशी अख्यायिका आहे. या दिवशी संध्याकाळी रथ विष्णूपदावर आणतात. इथे स्थानिक शेतकरी ज्वारीची ताटे वगैरे लावून रथ सुशोभित करतात. विष्णूपदावर अभिषेक होतो आणि त्यानंतर दिंडी, वाजंत्रीसहित रथ पंढरपुरात येतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें