आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

मागील आठवड्यात महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले होते, यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

नाशिक : मागील आठवड्यात महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले होते, यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील बळीराजा चिंतेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे अनेक नुकसानग्रस्त भागांना भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील आज नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. (Will provide free rations to disaster victims; Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal’s announcement)

यावेळी भुजबळ म्हणाले की, अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे, अशा निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार आहोत.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरेदेखील दोन-दोन दिवस पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून प्रती कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या 08 मार्च 2019 च्या (सीएलएस-2018/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार

खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शरद पवारांची बळीराजाशी ‘मन की बात’

शरद पवार यांनी आज तुळजापूरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली.

तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली.

संबंधित बातम्या

शरद पवार बांधावर जाणार नाहीत तर बंगल्यात बसून राहतील काय?; गुलाबराव पाटलांचा सवाल

तुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा : संभाजीराजे

आता सगळं संपलं असं हवामान खाते सांगत नाही, तोपर्यंत पंचनामे नाही : अब्दुल सत्तार

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

(Will provide free rations to disaster victims; Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal’s announcement)

Published On - 6:45 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI