वडिलांचीही वायूसेनेतच सेवा, कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन?

वडिलांचीही वायूसेनेतच सेवा, कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन?

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केला. पण काही वेळातच दोन नसून एकच पायलट आमच्याकडे असल्याचा यू टर्न पाकिस्तानने घेतला. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पायलटचं नाव विंग कमांडर अभिनंदन वर्धमान असं आहे. त्यांच्याबाबत अजून भारतीय वायूसेनेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण पाकिस्तानने जो व्हिडीओ रिलीज केलाय, त्यात अभिनंदन यांनी स्वतःबद्दल सांगितलं आहे. पाकिस्तानकडून दिवसभरात दुसरा व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय.

कोण आहेत अभिनंदन वर्धमान?

अभिनंदन हे भारतीय वायूसेनेत विंग कमांडर आहेत. बुधवारी ते मिग 21 हे विमान घेऊन उड्डाण घेतलं, पण पाकिस्तानने हे विमान पाडलं. अभिनंदन यांनी स्वतःची सुटका तर केली, पण ते खाली पडलेल्या अवस्थेत असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली. स्थानिकांकडून अभिनंदन यांना मारहाणही करण्यात आली.

पाकिस्तानने सकाळी जो व्हिडीओ रिलाज केला, त्यात अभिनंदन यांच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होतं. पण दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते चहा पिताना दिसत आहेत. शिवाय मी सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अभिनंदन आपण दक्षिण भारतीय असल्याचं सांगत आहेत. शिवाय लग्न झालेलं आहे का असं विचारल्यानंतर त्यांनी हो उत्तर दिलं.

अभिनंदन यांना देशसेवेचं बाळकडू घरातून मिळालंय. त्यांचे वडीलही भारतीय वायूसेनेतच होते. अभिनंदन हे 2004 मध्ये वायूसेनेत दाखल झाले. अभिनंदन यांना अटक केल्याची माहिती समोर येताच भारतात त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अभिनंदन यांना परत आणा म्हणून मोहिम राबवण्यात आली.

भारताकडूनही अभिनंदन यांच्या सुटकेची मागणी

पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या बैठकीत भारताकडून पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आलाय. भारतीय विंग कमांडरला आमच्या ताब्यात देण्यात यावं, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशाराही भारताने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीय पायलटला सोडवण्यासाठी केंद्र सरकारनेही आता दबाव टाकणं सुरु केलं आहे.

संबंधित बातम्या :

मी सुखरुप आहे, पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा दुसरा व्हिडीओ जारी

आमच्या पायलटला ताब्यात द्या, भारताची पाकिस्तानकडे अधिकृत मागणी

पाकिस्तान बेपत्ता पायलटच्या केसालाही धक्का लावू शकत नाही

कारगिल युद्ध : या पायलटने आठ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात काढले होते

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI