पालकमंत्र्यांचा फोन न घेतल्याने डॉक्टर निलंबित, तीन जणांना कारणे दाखवा नोटीस

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. तर तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांचा फोन न घेतल्याने डॉक्टर निलंबित, तीन जणांना कारणे दाखवा नोटीस

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे (Yavatmal Doctor Suspension). तर तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. अच्युत नरोटे या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती (Yavatmal Doctor Suspension). त्यादरम्यान, एकाचवेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टर गोंधळले होते. तेवढ्यात एका विष बाधित रुग्णासाठी राजकीय वशीला घेऊन आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेट जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना फोन लावला. उपचारात व्यस्त असलेल्या डॉक्टरला ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे या नातेवाईकाने सांगितले. मात्र, ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो, अथवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये’ असे उत्तर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिले.

रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातले हे संभाषण फोनवर असलेल्या भाऊने ऐकले. यानंतर कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी थेट आठ दिवस निलंबन करण्यात आल्याचे पत्रच मिळाले. हा प्रकार पाहून या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला जबर धक्का बसला. कुठलाही दोष नसताना केवळ फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का, असा प्रश्न त्याने आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला. या संदर्भात मार्ड संघटनेने अधिष्ठाता यांना निवेदन देऊन कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे.

तर लोकप्रतिनिधीचा अवमान केला म्हणून आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी त्या डॉक्टरवर कारवाई करण्यात आल्याचं महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

या संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, “यवतमाळ मधील त्या डॉक्टरला आठ दिवसांची शिक्षा दिली आहे. तीही मी नव्हे, तर तिथल्या अधिष्ठाता यांनी त्याला शिक्षा दिली आहे. तो डॉक्टर रुग्णाच्या वडिलांशी नीट बोलत नव्हता, त्या डॉक्टर बद्दल अनेक तक्रारीही होत्या. लोकप्रतिनिधींनीही त्याची तक्रार केली होती. हे सर्व पाहून तिथल्या अधिष्ठाता यांनी कारवाई केली आहे.” याबाबत आता मी यवतमाळ ला जाणार आहे. अधिष्ठाता आणि संबंधित डॉक्टरला भेटून नेमकं काय घडले आहे? ही माहिती घेणार असल्याचंही संजय राठोड यांनी सांगितले.

“फोन न उचलणे हे निमित्त असू शकते, मात्र अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. प्रशासन अतिशय ढिम्म आहे, दहा मिनिटांच्या कामासाठी मला दोन तास थांबावं लागलं, राजकीय नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांची तेवढी जबाबदारी आहे. मंत्री महत्वाचा नाही काम कोणतं आहे ते महत्वाचं आहे”, अशी प्रतिक्रिया जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI