आरोग्य विभागाच्या नोकरीसाठी तरुणांची फसवणूक

आरोग्य विभागाच्या नोकरीसाठी तरुणांची फसवणूक

लातूर : राज्यात आरोग्य विभागात मोठ्या नोकर भरतीचं आमिष दाखवून असंख्य बेरोजगार तरुणांना फसवणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे या टोळीने नोकर भरतीची बनावट वेबसाईट तयार करून जाहिरात करीत, खोट्या-खोट्या मुलाखतीही पुण्याच्या ससून रुग्णालयात उरकल्या आहेत. आता या गोरख धंद्यामुळे  फसवणूक झालेले अनेक तरुण समोर येत आहेत. यामध्ये अनेक शहरातील बरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

लातूर : राज्यात आरोग्य विभागात मोठ्या नोकर भरतीचं आमिष दाखवून असंख्य बेरोजगार तरुणांना फसवणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे या टोळीने नोकर भरतीची बनावट वेबसाईट तयार करून जाहिरात करीत, खोट्या-खोट्या मुलाखतीही पुण्याच्या ससून रुग्णालयात उरकल्या आहेत. आता या गोरख धंद्यामुळे  फसवणूक झालेले अनेक तरुण समोर येत आहेत. यामध्ये अनेक शहरातील बरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून अधिक तपास करत आहेत.

एका बनावट वेबसाईटवर या टोळीने आरोग्य विभागात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सुरक्षा रक्षक आणि सेवक पदाची भरती करण्यात येत असल्याची जाहिरात स्वतःच तयार केलेल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली. वेबसाईट तयार  करताना सगळं काही सरकारी भर्ती असल्या प्रमाणेच भासवण्यात आले. यामुळे असंख्य तरुण या टोळीच्या जाळ्यात अडकत गेले.

या टोळीमधील खरा सुत्रधार जितेंद्र भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच भोसले सोबत त्याच्या काही साथीदारांचाही यामध्ये समावेश आहे. जीतेंद्र भोसले हा मूळचा नवी मुंबईचा रहिवाशी आहे. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने खोटी भरती प्रक्रिया करत अनेकांची फसवणूक केली आहे. जितेंद्र भोसले हा आरोग्य विभागाचा सचिव असल्याचे भासवून परभणी, लातूर, मुंबई आणि इतर शहरात फिरत राहिला. पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबायचे आणि त्या-त्या शहरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करत त्यांच्याकडून काम देतो असे सांगत लाखो रुपये उकळत असे, हा धंदाच त्याने उघडला होता. नोकरीसाठी दहा ते बारा लाख रुपये तो घ्यायचा असा पोलिसांचा अंदाज आहे. अनेक जिल्ह्यात साखळी तयार करून पैसे उकळल्या नंतर भोसले आणि त्याची टोळी काही दिवस गायब झाली.

काही दिवसांनी अचानक पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये मुलाखती घेण्यात येणार असल्याचे पत्र काही जणांना मिळाले. त्यामुळे अनेकजण ससूनमध्ये मुलाखतीसाठी पोहचले. तिथे त्यांच्या मुलाखतीही झाल्या मात्र पुढे काहीच झाले नाही. जेव्हा धाडस करून फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांत धाव घेतली तेव्हा जितेंद्र भोसले आणि त्याच्या टोळीचा पर्दाफाश झाला.

पैसे देऊन नोकरी मिळत नाही हे माहित असतानाही निव्वळ अमिषापोटी अनेकजण भोसले सारख्या भामट्याच्या हाती लागतात हे सत्य आहे. आपण तर सावध रहाच  मात्र असे कोणी फसणार असेल तर त्याला अश्या  भामट्यापासून दूर ठेवा आणि भामट्यांची माहिती पोलिसांना द्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें