डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर घ्यायला नकार, झोमॅटोचे सडेतोड उत्तर
झोमॅटोच्या एका ग्राहकाने डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने त्याच्याकडून डिलिव्हरी घेण्यास नकार दिला. तसेच ट्विटरवर याबाबत स्क्रिनशॉट शेअर केला. त्याला झोमॅटोने चांगलेच सडेतोड उत्तर दिले.

मुंबई : ऑनलाईन फूड सर्व्हिस वेबसाईट झोमॅटोला सध्या एका वेगळ्याच प्रकरणाचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण धार्मिक आधारावर भेदभाव करण्यासंबंधित आहे. झोमॅटोच्या एका ग्राहकाने डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने त्याच्याकडून डिलिव्हरी घेण्यास नकार दिला. तसेच ट्विटरवर याबाबत स्क्रिनशॉट शेअर केला. त्याला झोमॅटोने चांगलेच सडेतोड उत्तर दिले. अन्नाचा कोणताही धर्म नसतो, अन्न हाच एक धर्म असल्याचे झोमॅटोच्या अधिकृत ट्विटरवरुन सांगण्यात आले.
Food doesn’t have a religion. It is a religion. https://t.co/H8P5FlAw6y
— Zomato India (@ZomatoIN) July 31, 2019
धर्माच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या या व्यक्तीला प्रथम झोमॅटोने उत्तर दिले. त्यानंतर झोमॅटोचे संस्थापक दिपेंद्र गोयल यांनीही उत्तर देत झोमॅटोची भूमिका स्पष्ट केली. दिपेंद्र गोयल म्हणाले, “आम्हाला भारताच्या वैविध्यपूर्ण स्वरुपाचा, मुल्यांचा, ग्राहक आणि भागीदारांमधील वैविध्याचा अभिमान आहे. या मुल्यांसाठी आम्हाला व्यवसाय काही नुकसान होणार असेल, तर आम्हाला याचा अजिबात खेद वाटत नाही.”
We are proud of the idea of India – and the diversity of our esteemed customers and partners. We aren’t sorry to lose any business that comes in the way of our values. ?? https://t.co/cgSIW2ow9B
— Deepinder Goyal (@deepigoyal) July 31, 2019
झोमॅटो आणि त्याचे संस्थापक दिपेंद्र गोयल यांच्याकडून आलेल्या या उत्तरानंतर ट्विटरवर याविषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी अनेक दिग्गजांनी झोमॅटोचे आणि त्याचे संस्थापक गोयल यांच्या ठोस भूमिकेचे कौतुक केले. ट्विटरवर अनेक युजर्सने डिलिव्हरी बॉयच्या धर्मावरुन अन्नपदार्थ नाकारणाऱ्या व्यक्तीचाही चांगलाच समाचार घेतला.
अमित शुक्ल यांनी मंगळवारी याबाबत ट्विटरवर तक्रार केली होती. अमित शुक्ल यांनी म्हटले होते, “मी आत्ताच झोमॅटोची एक ऑर्डर रद्द केली आहे. झोमॅटोकडून माझी ऑर्डर पोहचवण्यासाठी एका गैरहिंदू डिलिव्हरी बॉयला पाठवण्यात आले होते.” या ट्विटसोबत अमित शुक्ल यांनी अनेक स्क्रीनशॉट देखील जोडले होते.
दरम्यान, भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याने ट्विटर युजर्सने या व्यक्तीला चांगलेच ट्रोल केले. तसेच समाजात द्वेष पसरवत असल्याचे म्हणत ट्विटरकडे हे अकाऊंट ब्लॉक करण्याची मागणी केली.