आठवड्यातून 3 वेळा फ्रेंच फ्राईज खाणे पडू शकते महागात, या आजाराचा वाढतो धोका
काहींना रोज बटाट्याचे चिप्स किंवा फ्राईज खाण्याची सवय असते जी आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक असते. आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा दोनदा जरी फ्राईज खाल्ले तरी देखील त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे एक आजारही तुम्हाला होऊ शकतो. तो कोणता? जाणून घेऊयात

रोजच्या जेवणात किंवा आठवड्यातून एक-दोनदा बटाट्याचे चिप्स किंवा फ्राईज खाण्याची अनेकांना सवय असते. पण असे करणे सर्वात जास्त महागात पडू शकते. जर तुम्हाला दररोज बटाट्याचे चिप्स किंवा फ्राईज खायला आवडत असतील तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. एका नवीन आंतरराष्ट्रीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही सतत फ्रेंच फ्राईज , चिप्स खात असाल तर तुम्हाला टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. संशोधनात असे म्हटले आहे की, तुम्ही काय खात आहात हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही अन्न कसे खात आहात हे महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ, जर तुम्ही उकडलेले किंवा बेक केलेले बटाटे खाल्ले तर त्याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पण, जर तुम्ही तळलेले बटाटे खात असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याच्या चिप्स खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे कोणते आजार होऊ शकतात याबद्दल जाणून घेऊयात.
सतत फ्रेंच फ्राईज खात असाल तर….
एका नवीन अभ्यासानुसार , जर तुम्ही दररोज फ्रेंच फ्राईज खाल्ले तर ते टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढवू शकते. केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांनीही डेटा जारी केला आहे. त्यात असे म्हटले आहे की जे लोक आठवड्यातून 3 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा फ्रेंच फ्राईज खातात त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका सुमारे 20 ते 27% असतो.
फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी कसे हानिकारक आहेत?
असे सांगितले जाते की बटाटे ज्या पद्धतीने शिजवले जातात त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. फ्रेंच फ्राईज खोलवर तळून बनवल्या जातात, ज्यामध्ये अस्वास्थ्यकर चरबी आणि सोडियम असते. यामुळे जळजळ, वजन वाढणे आणि इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते, जी टाइप 2 मधुमेहाची सर्वात मोठी कारणे आहेत. त्यामुळे फ्रेंच फ्राईजऐवजी उकडलेले किंवा बेक केलेले बटाटे खाणे कधीही उत्तम. पण ते देखील मर्यादित प्रमाणात असावे.
टाइप 2 मधुमेह म्हणजे काय?
टाइप 2 मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. किंवा शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हा आजार अनेकदा अस्वस्थ खाणे, लठ्ठपणा आणि कमी शारीरिक हालचालींमुळे होतो.
टाइप 2 मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत?
टाइप 2 मधुमेहाची लक्षणे अगदी सामान्य आहेत. अशा परिस्थितीत लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. जसे की खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे. काही लोकांना खूप भूक देखील लागते. त्याच वेळी,थकवा जाणवणे, दुखापत किंवा जखमा लवकर बऱ्या न होणे. कधीकधी हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे. अशी लक्षणे दिसू लागतात. याचा परिणाम हा डोळ्यांवरही होतो. तसेच यामुळे अंधुक दिसणे किंमा कमी दिसणे अशा गोष्टी देखील होतात. जर तुमची त्वचा वारंवार कोरडी होत असेल किंवा वजन कमी होत असेल तर तुम्हाला टाइप 2 मधुमेहाची समस्या असू शकते.
महत्त्वाची टीप: तुम्हाला आरोग्याबाबत कोणताही बदल जाणवला किंवा कोणतीही लक्षणे जाणवली तर घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम
