Home Cleaning Tips : दररोज घर झाडण्याचा येतोय कंटाळा, ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा, वाचेल वेळ
Home Cleaning Tips : आजच्या धकाधकीच्या जीवनात रोज घर साफ करणं फार कठीण आहे. महिलांकडे फक्त घर साफ करण्याचं नाही, इतर देखील बरीच कामं असतात. तर 'या' स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही घराची सफाई करु शकता, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल..

Home Cleaning Tips : आता पाहायला गेलं तर, पुरुषांप्रमाणे महिला देखील बाहेरची कामं करु लागल्या आहेत. पण त्यांना घर देखील सांभाळावं लागत आहे. अशात घर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. परंतु रोजच्या धावपळीत, प्रत्येकाला संपूर्ण घर झाडणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, स्पॉट क्लीनिंग हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्याद्वारे संपूर्ण घर स्वच्छ करण्याऐवजी, फक्त घाणेरडा भाग स्वच्छ करता येतो. स्पॉट क्लीनिंग म्हणजे घरातील फक्त तो विशिष्ट भाग स्वच्छ करणं, जिथे डाग, धूळ, अन्नाचे कण किंवा पाणी सांडलेले असेल. यासाठी संपूर्ण फरशी झाडण्याची आवश्यकता नसते. तो भाग ओलसर कापड, मायक्रोफायबर कापड किंवा योग्य क्लिनरने सहजपणे स्वच्छ केला जाऊ शकतो.
जेव्हा स्वयंपाकघरात तेल किंवा अन्न सांडतं, जेवणाच्या टेबलाजवळ अन्न पडतं किंवा मुलांच्या खेळामुळे फरशी घाण होते, तेव्हा ही पद्धत उपयुक्त ठरते. बाथरूमच्या बाहेर पाण्याचे थेंब किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ घाण दिसल्याससुद्धा तुम्ही ते लगेच स्वच्छ करू शकता. डाग काढण्यासाठी, तुमच्याकडे एक मायक्रोफायबर कापड, एक छोटा मॉप, पाण्याची स्प्रे बॉटल आणि फरशीसाठी योग्य क्लिनर या वस्तू असायला हव्यात. सर्वसाधारण धूळ किंवा हलक्या डागांसाठी, साधं पाणी पुरेसे असू शकते.
या पद्धतीमुळे दररोज संपूर्ण घर झाडण्याचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचू शकतात. लहान घाण लगेच स्वच्छ केल्याने डाग पक्के बसण्यापासून बचाव होतो आणि घर अधिक स्वच्छ दिसते. ज्या घरांमध्ये लहान मुले आणि पाळीव प्राणी आहेत, तिथे ही पद्धत विशेषतः उपयुक्त ठरू शकते.
स्वच्छता करताना, फरशीच्या प्रकारानुसार क्लिनरची निवड करावी. जास्त पाणी वापरल्याने लाकडी फरशी खराब होऊ शकते, तर संगमरवरी फरशीवर आम्लयुक्त क्लिनर वापरणं टाळावं. स्वच्छता केल्यानंतर ती जागा कोरडी ठेवणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून घसरण्याचा धोका राहणार नाही.
स्पॉट क्लीनिंगचा अर्थ असा नाही की तुम्हाला संपूर्ण घर स्वच्छ करण्याची गरज नाही. उलट, रोजचे छोटे डाग आणि घाण लगेच स्वच्छ करण्याची सवय लावल्यास घर स्वच्छ ठेवणं सोपं जातं. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा गरजेनुसार अधिक वेळा संपूर्ण घर व्हॅक्यूमने स्वच्छ केले पाहिजे. या टिप्स वापरल्यास तुमचं घर देखील स्वच्छ राहील.
