…तर घरामध्येही यायला घाबरणार नाही; संविधान बचाव रॅलीत सतेज पाटलांकडून मोठी भीती व्यक्त
सतेज पाटील यांनी संविधान बचाव रॅलीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सतेज पाटलांसोबत इतर नेत्यांनीही जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेसकडून ठाण्यात संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीतून काँग्रेसच्या नेत्यांकडून विरोधकांवर जोरदार टीका केली. संविधान दिनानिमित्त रॅलीनंतर आयोजित सभेत आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला. आता रस्त्यावर उतरलो, तर हे घरामध्येही यायला घाबरणार नाही, अशा शब्दात सतेज पाटील यांनी भीती व्यक्त केली
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी संविधान बचाव रॅलीत संवाद साधला. सतेज पाटील म्हणाले, ‘ठाण्यात लोकशाहीची हत्या तीन वर्षापूर्वी झाली, त्या ठाण्यात रॅली झाली पाहिजे. व्होट चोरी झाली, गोकुळमध्ये सत्ता चोरी झाली नाही. रस्त्यावर उतरलो नाही, तर हे घरामध्ये यायला घाबरणार नाही. आपल्याला सगळ्यांना एक वाघ होऊन चालणार नाही, लाखो वाघ होऊन सरकारला खाली आणावं लागेल. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार टिकवण्यासाठी दोन वर्ष पुढे लढा सुरू ठेवायचा आहे’.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘वोट चोर, गद्दी छोड. आपला पक्ष समता, बंधुता, सामाजिक न्याय, सर्व धर्म समभाव शिकवतो. आपण संविधानवादी आहोत आणि भाजप मनुवादी आहे. मनुवाद्यांना स्त्री पुरुष समानता नाकारायची आहे. आज देशात, केंद्रात, महाराष्ट्रात मनुवादी आहेत. संविधान जेव्हा दिलं जात होत, तेव्हा रेशीमबागेत असलेले विरोध करत होते. महाराष्ट्रात काय सुरु आहे, पुण्यात कोयता गँग आली, पुण्य नगरी आता कोयता नगरी झाली.
‘ठाण्यात पूर्णेकरच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. देशात वोट चोरी सुरु आहे, एसआयआर सुरु आहे. झाडखाऊ मुख्यमंत्री, जिथे जाऊ तिथे खाऊ, असा आहे आपला झाडखाऊ, देवाभाऊ झाडखाऊ. संविधान बचाव रॅली का, तर संविधानाची पायमल्ली इथून सुरु झाली. 50 खोके एकदम ओके, हे असंविधानिक सरकार आहे. ज्यांनी गद्दारी या महाराष्ट्रात आणली, त्यांच्या छातडावर पाय देऊन संविधानाचा जागर याठिकाणी करायचा आहे, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘पुन्हा स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली आहे. हे संविधान पायदळी तुडवले जात आहे. भाजप सरकार संविधान धोक्यात आणत आहे. सर्व सामन्यांचे हक्क हिरावले जातील. स्वायत्त संस्था स्वायत्त राहिले नाही. सगळ्या काळात जागृती करणे. गावोगावी रॅली काढावी लागेल’.
