
भारतीय संस्कृतीत तुळशीचं रोप हे फक्त एक रोप नसून ते श्रद्धा आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. अनेक घरांमध्ये दररोज तुळशीची रोज पूजा केली जाते. तुळशीच्या रोपट्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पण, बऱ्याचदा योग्य काळजी न घेतल्यामुळे तुळशीचं रोप सुकायला लागतं. काही वेळा त्याची पानं काळी पडतात. अशावेळी अनेकांना काय करावे काहीही कळत नाही. पण यामागे काही साध्या चुका असतात, ज्या तुम्ही टाळलात तर तुम्हाला फायदा होतो.
गार्डनिंग एक्सपर्ट मयूर मंदराह यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी तुळशीचे रोप सुकण्यामागील कारण आणि तुळशीला पुन्हा हिरवीगार कसं करायचं यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, त्याची योग्य काळजी घेऊन वेळच्या वेळी खत दिल्यास तुमचं सुकलेलं तुळशीचं रोप पुन्हा नव्याने बहरेल.
तुळशीच्या रोपाला जेव्हा मंजिरी बीज असलेला भाग येतो, तेव्हा त्या लगेचच काढून टाकणं खूप महत्त्वाचं असते. जर तुम्ही असं केलं नाही, तर रोप आपली सगळी शक्ती बीजं बनवण्यात खर्च करते. त्यामुळे त्याची वाढ थांबते. यामुळे महिन्यातून एकदा तुळशीच्या रोपावरील वरच्या फांद्या हलक्याशा छाटा. यामुळे रोपाला नवीन फांद्या फुटतात. ते आणखी दाट आणि हिरवं होतं.
तुळशीला सूर्यप्रकाशाची गरज असते. पण जर जास्त वेळ थेट उन्हात ठेवलं तर त्याची पानं जळू शकतात. म्हणून तुळशीचं रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला सकाळी आणि संध्याकाळचं कोवळं ऊन दाखवा. पण तुळशीच्या रोपाला दुपारच्या कडक उन्हात ठेवणं टाळा. तुळशीच्या रोपाला सकाळचे २ ते ३ तास ऊन पुरेसं असते.
आपल्यापैकी अनेकजण तुळशीला रोज पाणी देतो. पण हे चुकीचं आहे. जास्त पाणी दिल्याने तुळशीच्या रोपाची मुळं कुजतात. यामुळे रोप मरतं. तुळशीला रोज पाणी देण्याऐवजी जेव्हा माती कोरडी वाटेल तेव्हाच त्याला पाणी द्या. साधारणपणे, हिवाळ्यात आठवड्यातून १ ते २ वेळा आणि उन्हाळ्यात २ ते ३ वेळा पाणी देणं पुरेसं आहे. त्याला पाणी देताना जास्तीचे पाणी कुंडीच्या खालच्या छिद्रातून बाहेर येईल, याकडे नक्की लक्ष द्या.
रोपाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य वेळी खत देणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा तुळशीच्या रोपट्यात शेणखत टाका. यासोबतच पानांना हिरवं आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही एप्सम सॉल्टची (Epsom salt) फवारणी करू शकता. यासाठी, एक लीटर पाण्यात अर्धा चमचा एप्सम सॉल्ट मिसळा. हे मिश्रण स्प्रे बॉटलने पानांवर फवारा.