वन्यजीव प्रेमींसाठी खुशखबर! IRCTC च्या ‘वनदर्शन’ योजनेत मिळणार 5 खास टूर पॅकेजेस; नोव्हेंबरपासून मुंबईहून सुरू होणार सहली
Vandarshan Wildlife Tour Package: वन्यजीव प्रेमी आणि जंगल सफारीची आवड असणाऱ्यांसाठी IRCTC ने 'वनदर्शन' योजने अंतर्गत 5 खास टूर पॅकेजेस आणली आहेत. या सहली नोव्हेंबरपासून मुंबईहून सुरू होणार असून, पर्यटकांना विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांना भेट देता येणार आहे. या पॅकेजेसमध्ये कोणत्या सुविधा मिळणार, किती खर्च येणार आणि बुकिंग कसं करायचं, ते येथे वाचा.

प्रवासाची आवड असणाऱ्या अनेकांना निसर्गरम्य ठिकाणं, घनदाट जंगलं आणि वन्यजीव अभयारण्यांना भेट द्यायला आवडते. विशेषतः जंगल सफारी करून वाघ आणि इतर वन्य प्राणी पाहण्याचा अनुभव अनेकांसाठी खास असतो. अशा पर्यटकांसाठी भारतीय रेल्वे केटरिंग आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने ‘वनदर्शन’ ही खास पर्यटन योजना आणली आहे. या योजने अंतर्गत मुंबईहून 5 वेगवेगळी वाइल्डलाइफ टूर पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सहली 19 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहेत. जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती.
काय आहे IRCTC ची ‘वनदर्शन’ योजना?
IRCTC ने ‘वनदर्शन – Explore Nature, Discover Wildlife’ या नावाने विशेष पर्यटन योजना सुरू केली आहे. यामध्ये पर्यटकांना रेल्वे प्रवास, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, स्थानिक वाहतूक आणि जंगल सफारीचा अनुभव एकाच पॅकेजमध्ये मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील वन्यजीव पर्यटनाला चालना देणं हा आहे.
कोणत्या ठिकाणांना भेट देता येणार?
वनदर्शन योजने अंतर्गत पर्यटकांसाठी 5 वेगवेगळी टूर पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश आहे.
• ताडोबा-अंधारी आणि बोर व्याघ्र प्रकल्प • ताडोबा-अंधारी आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प • पेंच व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य • ताडोबा-अंधारी आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य • ताडोबा-अंधारी आणि टिपेश्वर अभयारण्य
किती दिवसांची असेल सहल?
IRCTC च्या वनदर्शन योजनेतील प्रत्येक टूर पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांचं असेल. या सहली 19 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहेत. पर्यटकांना जंगल सफारीसह विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
कोणत्या ट्रेनने करता येणार प्रवास?
या सहलींसाठी विदर्भ एक्स्प्रेसची सुविधा उपलब्ध असेल. ट्रेन क्रमांक 12105 दर गुरुवारी मुंबईहून रवाना होईल. तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 12106 दर रविवारी गोंदियाहून सुटेल. मात्र, पर्यटकांनी निवडलेल्या टूर पॅकेजनुसार चढण्याचं आणि उतरण्याचं स्थानक वेगवेगळं असू शकतं.
वनदर्शन योजनेचं खास वैशिष्ट्य काय?
या योजनेअंतर्गत पर्यटकांना निवडलेल्या टूर पॅकेजनुसार कन्फर्म रेल्वे तिकीट, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, स्थानिक वाहतूक आणि जंगल सफारीसाठी आवश्यक परवाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. IRCTC च्या पश्चिम विभागाने प्रत्येक सहलीसाठी मर्यादित जागा राखीव ठेवल्या आहेत. यामध्ये एसी थ्री टियर (3AC) मध्ये 6 आणि एसी टू टियर (2AC) मध्ये 6 बर्थ उपलब्ध असतील. पर्यटकांना IRCTC च्या अधिकृत पर्यटन वेबसाइटवरून या सहलींचं बुकिंग करता येणार आहे.
