
आजच्या डिजिटल युगात फ्रिलान्सिंग ही संकल्पना नवीन राहिलेली नाही. अनेकजण आयटी, कंटेंट रायटिंग, डिझाइनिंग यासारख्या क्षेत्रात फ्रीलान्सिंग करताना दिसतात. मात्र, एखाद्याला सांगितलं की एअर होस्टेसही फ्रीलान्स असू शकतात, तर थोडं आश्चर्य वाटेल. होय, ‘फ्रीलान्स एअर होस्टेस’ ही एक नवी व रोमांचक करिअर संधी म्हणून पुढे येत आहे.
फ्रीलान्स एअर होस्टेस या मुख्यतः प्रायव्हेट जेट्ससाठी काम करतात. त्या कोणत्याही एका एअरलाइनला कायमस्वरूपी बांधिल नसतात. त्याऐवजी त्या विविध चार्टर कंपन्यांसाठी गरजेनुसार काम करतात. त्यांचे काम फिक्स सैलरीवर नसते, तर प्रत्येक ट्रिपनुसार त्यांना पैसे दिले जातात. प्रवास जितका जास्त तितका उत्पन्न अधिक, अशा प्रकारे त्यांचे मानधन ठरते.
फ्रीलान्स एअर होस्टेस होण्यासाठी पारंपरिक प्रोफेशनल एअर होस्टेस ट्रेनिंगची गरज लागत नाही. मात्र, आवश्यक कौशल्य शिकवणारे काही विशेष अभ्यासक्रम केले जातात. हे कोर्स साधारणपणे 3.4 लाख रुपयांपर्यंत खर्चिक असतात. या प्रशिक्षणात प्रवाशांना ड्रिंक्स सर्व करणे, उत्तम प्रकारे जेवण देणे, ग्राहक सेवा कौशल्ये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाते.
एअर होस्टेसचे काम फक्त सेवा देण्यापुरते मर्यादित नसते. विमानात इमर्जन्सी परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांचे प्राण वाचवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. त्यामुळे हे प्रशिक्षण त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
फ्रीलान्स एअर होस्टेस या एक डेटाबेसमध्ये नोंदविल्या जातात. चार्टर कंपन्या जेव्हा एखाद्या खासगी प्रवासासाठी बुकिंग करतात, तेव्हा त्या याच डेटाबेसमधून फ्रीलान्स एअर होस्टेसना संपर्क करतात. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असते की त्यांनी कोणती ट्रिप घ्यायची आणि कोणती नाही हे ठरवावे. त्यामुळे त्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याला सुद्धा पुरेसा वेळ देऊ शकतात.
या कामात सर्वात मोठा फायदा म्हणजे फ्रीलान्स एअर होस्टेसना विविध देशांची सफर करता येते. जागतिक पातळीवर श्रीमंत आणि उच्चभ्रू प्रवाशांशी देखील त्यांना संपर्क साधण्याची संधी मिळते. त्यामुळे केवळ कमाईच नाही तर एक भव्य अनुभवसंपन्न आयुष्य जगण्याची संधीही मिळते.
फ्रीलान्स एअर होस्टेसना स्थिर पगार नसतो. प्रत्येक फ्लाइटनुसार त्यांना मानधन दिले जाते. काही विशेष चार्टर फ्लाइटसाठी एक ट्रिपचे मानधन लाखोंमध्येही पोहोचू शकते. तसेच टीप्स व इतर सुविधा यात अतिरिक्त उत्पन्न मिळते.