घरीच तयार करा ‘हा’ आयुर्वेदिक आय मास्क, डोळ्यांभोवती डार्क सर्कल आणि सूज होईल कमी
डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे आणि सूज यामुळे तुमचा चेहरा निस्तेज दिसू शकतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती म्हणजेच आयुर्वेदिक अंडर-आय मास्क बनवून लावा. चला तर मग हे आयमास्क कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. त्यातही डोळ्यांखालील काळी वर्तुळे ही समस्याही आपल्यापैकी अनेकांना सतावत असते. अन डोळ्यांचे सौंदर्यही कमी होते. त्यातच डोळ्यांखाली सूज असेल तर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वाढत्या वयानुसार सामान्यपणे दिसतात, परंतु अकाली आलेली काळी वर्तुळे आणि डोळ्यांखालील सूज अत्यंत त्रासदायक ठरू शकते. कधीकधी चुकीची दैनंदिन दिनचर्या याला कारणीभूत ठरू शकते, जसे की बराच वेळ फोन किंवा स्क्रीनकडे टक लावून पाहणे. झोपण्याच्या आणि उठण्याच्या चुकीच्या वेळांमुळे देखील त्वचेचे नुकसान होऊ शकते.
अशातच तुम्ही जर योग्य पद्धतीने जीवनशैलीचा अवलंब केल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते. त्याच बरोबर त्वचेची बाह्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. या लेखात आपण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेल्या आय मास्कबद्दल जाणून घेणार आहोत. हा मास्क काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
जर तुम्ही महागड्या अंडर-आय क्रीम्स आणि आय पॅचेस लावून थकला असाल, तर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी शिफारस केलेला हा अंडर-आय मास्क वापरून पहा. यामध्ये अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेले घटक वापरले आहेत. हा अंडर-आय मास्क तुमच्या त्वचेला थंडावा देऊन आराम देईल, ज्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील. चला तर मग हा अंडर-आय मास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
आयुर्वेदिक घटकांपासून आय मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तुम्हाला काकडीचे 3-4 तुकडे, बटाट्याचे 3-4 काप, 1 चमचा कोरफडीचा गर, 1 चमचा बदामाचे तेल, अर्धा चमचा मध, 2 मोठे चमचे हिरड्याची पूड, 2-3 केशरच्या काड्या, 1/4 चमचा जायफळाची पूड
डोळ्यांखालील मास्क कसा बनवायचा?
सर्वप्रथम काकडीचे आणि बटाट्याचे तुकडे एकत्र करून पेस्ट बनवा. त्यात कोरफड जेल, बदामाचे तेल,हिरड्याची पूड, मध, केशर आणि जायफळ पूड टाका. आता हे मिश्रण एकजीव करून पेस्ट तयार करा. एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. ही पेस्ट 1 ते 3 दिवस टिकेल.
आय मास्क कसा वापरावा?
तुम्ही ही पेस्ट डोळ्यांखालील मास्क म्हणून दिवसातून दोनदा लावू शकता. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी लावा. हा मास्क डोळ्यांखाली लावा आणि 12 ते 15 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर ओल्या स्पंजने तो हळुवारपणे पुसून टाका. यानंतर, डोळ्यांखालील भागावर 1-2 मिनिटे हळुवारपणे मसाज करा.
मास्क मुळे डोळ्यांना मिळेल आराम
त्यातच तुमच्या डोळ्यांखाली सूज असेल तर तुम्ही ग्रीन टी बॅग रेफ्रिजरेटरमध्ये थंड करून त्याचा शेक देऊ शकता. काकडीचे काप किंवा किसलेली काकडी देखील डोळ्यांना आणि त्वचेला आराम देते. या समस्येवर मात करण्यासाठी पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. 7 ते 8 तास चांगली, वेळेवर झोप घ्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवा. तुमच्या आहारातून जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मीठ व साखर जास्त असलेले पदार्थ कमी करा. याव्यतिरिक्त दररोज व्यायाम किंवा योगा करण्याची सवय लावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)