Parenting Mistakes: मुलांना शिस्त लावताना पालकांनी टाळाव्यात ‘या’ चुका, अन्यथा मुलांच्या मनावर होऊ शकतो परिणाम
अनेक वेळा मुलांना शिस्त लावणे कठीण काम वाटते. पण हे मुलांना शिकवण्यापूर्वी पालकांनीही काही गोष्टी सुधारणे गरजेचे आहे. शिस्त लावताना पालकांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे ते जाणून घ्या.

मुलांचे संगोपन करणे सोपे काम नाही. मुले अनेकदा आरशासारखी असतात. तुम्ही त्यांच्या कामात आणि वागण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहू शकाल. तुमची सर्व चांगली कामे करण्यासोबत तुमच्या मुलाने शिस्तबद्ध राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम पालकांनी स्वतःमध्ये शिस्तीची सवय लावली पाहिजे. मुले शिकतात कमी पण कॉपी सहज करतात. आई-वडील जे काही काम करतात, जसे वागतात ते मुलं अगदी सहज फॉलो करतात. मुलांना शिस्त लावताना कळत नकळत अशा काही गोष्टी घडतात ज्याचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांना शिस्त लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्या.
आपल्या चुकीची माफी अवश्य मागा जेव्हा मुलांकडून चूक होते तेव्हा आपण त्यांना सहजपणे माफी मागायला सांगतो किंवा त्यांची चूक मान्य करायला शिकवतो. पण स्वतःच्या चुकीवर पालक गप्प बसतात. ही चांगली सवय नाही. पालकांकडून जेव्हा एखादी चूक होते किंवा काहीतरी गडबड होते तेव्हा लगेचच ती चूक मुलासमोर मान्य करा. असे केल्याने मुलांमध्ये सुद्धा त्यांच्या चुकांची जबाबदारी घेण्याची भावना निर्माण होईल.
खोटी आश्वासने देऊ नका किंवा भीती घालू नका अनेक वेळा पालक काही काम करण्याचे वचन मुलांना देतात पण ते करण्याच्या वेळी काहीतरी कारण देऊन ते टाळतात. किंवा जर मुलाने चूक केली तर ते त्याला काहीतरी खोटे बोलून घाबरवतात. तर ही सवय त्वरित बंद करा. यामुळे मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय सहजतेने तयार होईल. तुमच्या शब्दांवर ठाम राहा. जर तुम्ही तुमच्या मुलाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना घाबरवू नका. अशाने मुलांच्या मनात भीती निर्माण होते.
इतरांच्या मुलांशी तुलना करू नका तुम्ही अनेकदा ऐकले असेल की तुमच्या मुलांची इतरांच्या मुलांशी, वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नका. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. पण मुलांच्या कुशाग्र मनामध्ये इतर पालकांची चांगली असल्याची प्रतिमा तयार होऊ लागते आणि ते तुमची तुलना इतर पालकांशी करू लागतात. त्यामुळे मुलांची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका.
