पावसाळ्याच्या थंडीत अशा प्रकारे घरच्या घरी बनवा झणझणीत चीझी नूडल्स
पावसाच्या हलक्या सरी, खिडकीतून येणारा थंड वारा आणि समोर गरमागरम चीझी नूडल्स... या पावसात असं काही खायला मिळालं तर घरचं वातावरणसुद्धा मनालीसारखं वाटायला लागेल. म्हणूनच, या पावसात ही खास रेसिपी एकदा नक्की करून पाहा, आणि अनुभव घ्या थेट ‘हिमालयी’ चविचा!

Rainy Day Recipe : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच काहीतरी चटकदार, गरमागरम खावंसं वाटतं. बाहेर पडून मनसोक्त भिजावं आणि घरी आल्यावर काहीतरी खास, दमदार खाणं हे त्या पावसाळी अनुभवाचं दुसरं सुख असतं.
आपण जसं हिमाचल किंवा मनालीसारख्या थंड प्रदेशात गेल्यावर तिथे गरमागरम चीझ नूडल्स खाण्याचा अनुभव घेतो, तसंच काहीसं आपण आपल्या घरातही तयार करू शकतो. आज आपण पाहणार आहोत ही खास ‘पावसाळी हंगामासाठी’ तयार केलेली चीझी नूडल्स रेसिपी जी खूप सोपी, झटपट होणारी आणि अगदी रेस्टॉरंट स्टाइल चवदार आहे.
साहित्य:
नूडल्स : 4 पाकिटं (खालील साहीत्य 4 पाकिट नूडल्सच्या प्रमाणे आहे, नूडल्सची पाकिटे कमी – जास्त झाल्यास त्याप्रमाणे सााहित्य घ्यावे)
बटर : 2 मोठे चमचे
कांदा : 1 मध्यम, बारीक चिरलेला
टोमॅटो :1 बारीक चिरलेला
शिमला मिरची : 1 लहान बारीक चिरलेली
हिरवी मिरची : 1 बारीक चिरलेली
आले : 1 चमचा किसलेलं
मीठ : चवीनुसार
नूडल्स मसाला (Maggi Masala या Magic Masala) – १ पाकिट
किसलेलं चीज किंवा चीज स्लाइस – आवश्यकतेनुसार
हिरवा कोथिंबीर – सजावटीसाठी
पाणी – सुमारे 3.4 ते 4 कप
रेसिपी:
एका खोलगट कढईत बटर गरम करा. त्यात आधी बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची घालून थोडंसं परतून घ्या. मग त्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घालून मध्यम आचेवर 2-3 मिनिटं परतवा. आता त्यात नूडल्स मसाला आणि मीठ घालून परत एक मिनिट परतवा.
यानंतर त्यात पाणी ओता आणि उकळी येऊ द्या. पाणी उकळल्यानंतर त्यात नूडल्स घालून शिजू द्या. नूडल्स सुमारे 80-90 टक्के शिजले की त्यावर किसलेलं चीज पसरवा आणि झाकण ठेवून दोन मिनिटं वाफवून घ्या. चीज व्यवस्थित मेल्ट झालं की नूडल्स तयार!
वरून कोथिंबीर घालून साजरं करा आणि त्याचसोबत कोल्ड ड्रिंक किंवा गरम कॉफी घेत ही पावसाळी शाम अधिक रोमँटिक बनवा.
ही रेसिपी का खास आहे?
1. कमी वेळात तयार होते
2. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चवीनुसार
3. घरबसल्या हिल स्टेशनचा अनुभव घेता येतो
