
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पालक आणि मुलांमध्ये संवादाची जागा झपाट्याने कमी होत चालली आहे. दिवस भर कामाचा व्याप, मोबाइल-टीव्हीचा वाढता वापर, शाळा-क्लासेसचा ताण, आणि तांत्रिक जीवनशैलीमुळे अनेकदा आई-वडिलांना आपलीच मुलं ‘दूर’ वाटायला लागतात. अनेक वेळा पालकांच्या मनात प्रश्न असतो “माझं मूल काहीतरी लपवतंय का?”, “तो तणावात आहे का?”, “अभ्यासात मन लागत नाहीये का?” पण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी गरज असते एक साध्या, समजूतदार संवादाची. त्यासाठीच उपयोगी पडतो ‘25 सेकंद पॅरेंटिंग मंत्रा’
प्रसिद्ध बाल मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, मुलांशी मोठमोठ्या चर्चा करण्याऐवजी, दररोज किंवा आठवड्यातून काही वेळ फक्त 1 ते 3 मिनिटं संवाद साधा तोही हलक्याफुलक्या भाषेत आणि एका विशिष्ट मुद्द्यावर. तुम्ही त्यांना काही शिकवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर समजून घेण्याच्या दृष्टीने ऐका. या पद्धतीने मुलं आपल्या मनातल्या गोष्टी हळूहळू व्यक्त करायला लागतात. ही पद्धत विशेषतः मुलांमध्ये अधिक प्रभाव टाकते कारण त्यांना काहीतरी “बोझ” वाटत नाही. ते सुरक्षित वाटू लागतात, आणि संवादाचं दार उघडतं.
मुलांचं लक्ष लवकर भटकतं, विशेषतः जेव्हा त्यांच्या समोर लांब, गंभीर किंवा शिकवण्याचा सूर असलेला संवाद येतो. अशा वेळेस ते किंवा गप्प बसतात, किंवा संवाद टाळतात. याउलट, जर संवाद हलकाफुलका, प्रश्नात्मक आणि मैत्रीपूर्ण असेल तर मुलं सहज संवाद साधतात आणि बोझ वाटत नाही.
विचार : संवादाची सुरुवात “मी तुला समजून घ्यायला इच्छुक आहे” या भावनेने करा. सल्ला देण्यासाठी नाही, तर ऐकण्यासाठी तयार आहात, हे समोरच्याला जाणवू द्या. मूल काय म्हणतंय, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, हालचाली हे बारकाईने पहा.
आवाज : तुमचं बोलणं कोमल, मैत्रीपूर्ण आणि समजूतदार असावं. उदाहरणार्थ, “आज काय विशेष घडलं?” किंवा “तू इतका शांत का आहेस?” अशा सहज प्रश्नांमधून संवाद सुरू करता येतो.
वेळ : सर्वात योग्य वेळ असते, जेव्हा मूल रिलॅक्स असतं उदा. झोपण्यापूर्वी, जेवताना, किंवा गाडीतून जाताना. लक्षात ठेवा, थेट डोळ्यांत बघत संवाद साधणं कधी-कधी मुलांना अस्वस्थ करतं, त्यामुळे सहज, बाजूला बसून संवाद जास्त परिणामकारक ठरतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)