हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शेतकरी नेते म्हणून ज्यांची आता देशभर ओळख निर्माण झालीय, त्या खासदार राजू शेट्टी यांचा हातकणंगले हा मतदारसंघ आहे. लोकांनी पैसे खर्च करुन निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी कित्येक वर्षे या ठिकाणी […]

हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?
Follow us on

कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शेतकरी नेते म्हणून ज्यांची आता देशभर ओळख निर्माण झालीय, त्या खासदार राजू शेट्टी यांचा हातकणंगले हा मतदारसंघ आहे. लोकांनी पैसे खर्च करुन निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी कित्येक वर्षे या ठिकाणी आपलं वर्चस्व ठेवलं. मात्र याच वर्चस्वाला राजू शेट्टी यांनी सलग दोन वेळा सुरुंग लावले.

ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करुन कोल्हापूर जिल्ह्यात उदयाला आलेलं शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर आमदार आणि आता खासदारकीच्या दोन टर्म राजू शेट्टी यांनी पूर्ण केल्या आहेत. कित्येक वर्षे हातकणंगले या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र ऊसाचा प्रश्न हाती घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची मर्जी मिळवली. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या ऊसाला काहीच भाव मिळत नव्हता त्यावेळी शेट्टी यांनी आंदोलन उभं केलं. त्यामुळे ऊसाला किमान चार आकडी भाव मिळू लागला. त्यामुळे काहीही झालं तरी शेट्टीच आमचे नेते असं गणित हातकणंगले मतदार संघात झालं.

खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जम बसला होता. मात्र ज्यावेळी सदाभाऊ यांना राज्यमंत्रीपद मिळालं त्यावेळी खासदार आणि भाऊ यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यानंतर खोत यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी खोत विरुद्ध शेट्टी असा संघर्ष सुरु झाला. भाजपने संघटना फोडली असा आरोप करुन खासदार शेट्टी यांनी एनडीए सरकारमधून काढता पाय घेतला. त्यानंतर खासदार शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका सुरु केली.

भाजपकडूनही शेट्टींना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण जनाधार शेट्टींच्या बाजूने असल्याने त्यांचेही प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीला सदाभाऊ खोत हे उमेदवार असतील असं मानलं जातं. खोत यांनी अनेक वेळा तसं बोलून देखील दाखवलं आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या माने गटाने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतलाय. धैर्यशील माने यांनी एक वर्षापूर्वीच आपण लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर करुन टाकलंय. माने गटाने या मतदार संघाचं सात वेळा प्रतिनिधीत्व केलंय.

आधी बाळासाहेब माने आणि त्यानंतर त्यांच्या सूनबाई निवेदिता माने या दोन वेळा खासदार झाल्या. मात्र 2009 साली राजू शेट्टी यांनी त्यांना पराभूत केलं. तर 2014 साली हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला. त्यावेळी माने गटाचं राजकीय पुनर्वसन करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटलं होतं. पण गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बेदखल केल्याचा आरोप माने गटाने केला. त्यामुळे ‘मातोश्री’वर जाऊन माने माय-लेकांनी भगवा खांद्यावर घेतला.

राजू शेट्टी यांनी 2009 साली निवेदिता माने आणि 2014 साली कल्लाप्पा आवाडे यांना पराभूत केलं. आता मात्र शेट्टी आघाडीसोबत जाणार आहेत. त्यामुळे आवाडे यांची देखील त्यांना मदत होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार म्हणून धैर्यशिल माने कामाला लागले आहेत.

हातकणंगलेत कुणाचं पारडं जड?

खासदार राजू शेट्टी यांना 2014 साली 6 लाख 40 हजार मतं मिळाली

विरोधक कल्लाप्पा आवाडे यांना 4 लाख 62 हजार मतं मिळाली

एकूण 1 लाख 77 हजार मतांनी राजू शेट्टी निवडून आले

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या 16 लाख 9 हजार एवढी आहे.

हातकणंगले मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये इस्लामपूर राष्ट्रवादीकडे, तर शिराळा भाजपकडे आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत भाजपचे आमदार आहेत. शिरोळ, शाहुवाडी, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. या लोकसभा मतदारसंघात जातीचं कार्ड खेळलं जातं. त्यामुळे पुन्हा या मतदारसंघावर शेट्टी यांचा स्वाभिमानी झेंडा फडकणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या :

पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार? 

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?