कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

कोल्हापूर: देशभरात 2014 मध्ये मोदी लाट उसळली असताना कोल्हापूरकरांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनं कौल देत ही लाट परतवून लावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात ही लढाई झाली. वैरत्व विसरुन सतेज पाटील (बंटी पाटील) आणि धनंजय महाडिक (मुन्ना) एकत्र आले, त्यामुळं महाडिक यांचा विजय सोपा झाला. महाडिकांनी तब्बल 31 हजार मतांनी शिवसेनेवर विजय मिळवला. […]

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

Follow us on

कोल्हापूर: देशभरात 2014 मध्ये मोदी लाट उसळली असताना कोल्हापूरकरांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनं कौल देत ही लाट परतवून लावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात ही लढाई झाली. वैरत्व विसरुन सतेज पाटील (बंटी पाटील) आणि धनंजय महाडिक (मुन्ना) एकत्र आले, त्यामुळं महाडिक यांचा विजय सोपा झाला. महाडिकांनी तब्बल 31 हजार मतांनी शिवसेनेवर विजय मिळवला. सेना-भाजपच्या हिंदुत्वाला आणि मोदी लाटेला महाडिक-बंटी पुरुन उरले.

2014  च्या लोकसभा निवडणुकीचे एक-एक निकाल भाजपच्या बाजूनं बाहेर पडत असताना कोल्हापूरचा निकाल मात्र लक्षवेधी ठरला. राज्यात सगळीकडे सेना-भाजप मुसंडी मारत होती. त्यामुळं कोल्हापूरच्या जागेचा अंदाज बांधणे कठिण झालं होतं. त्यातच प्रत्येक फेरीगणिक राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. अखेर निकाल जाहीर झाला आणि तब्बल 31 हजार मतांनी धनंजय महाडिक यांनी मंडलिक यांच्यावर विजय मिळवला.

धनंजय महाडिक यांचा मोदी लाटेतील हा विजय वाटतोय इतका सोपा नव्हता. यासाठी कोल्हापूर मतदार संघात त्यांना अनेक राजकीय तडजोडी कराव्या लागल्या. उमेदवारी मिळवण्यापासून ते विजयापर्यंत महाडिकांनी अनेक पातळीवर कसरत केली. राष्ट्रवादीत हयात घालवलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्या जागेवर 2009 साली संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. पण जनतेनं या राजाला नाकारलं. त्यामुळं महाडिकांसाठी 2014 सालची निवडणूक रणांगणातील लढाईपेक्षा वेगळी नव्हती.

आघाडीच्या वाटाघटीत धनंजय महाडिकांनी उमेदवारी मिळवली. मात्र विजयासाठी त्यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचं मोठं आव्हान होतं. या दोघांमध्ये राजकीय वैरत्व निर्माण झाले होते.त्यामुळं पहिल्यांदा सतेज पाटलांची अडचण दूर करणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळं राजकारणात कोण-कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो या वाक्याप्रमाणं महाडिकांनी सतेज पाटलांचं घर गाठलं आणि मदतीचं आवाहन केलं. दोन युवा नेत्यांच्या मिळालेल्या ताकदीमुळं निकालात परिवर्तन झालं.

लोकसभेला विजय मिळताच महाडिकांना स्वकर्तृत्वाची जाणीव झाली आणि त्यांनी सतेज पाटलांना या श्रेयापासून दूर ठेवलं. खासदर महाडिकांच्या या भूमिकेमुळं हे दोघे पुन्हा दुरावले. याचं प्रतिबिंब 2014  च्या विधानसभेत उमटलं. खासदार महाडिकांनी सतेज पाटलांच्या विरोधात भाजपकडून आपल्या चुलत भावाला निवडून आणलं. त्यामुळं राजकीय वैरत्व आणखी वाढलं ते आजपर्यंतही कायम आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉ. डी वाय पाटील यांना पक्षामध्ये घेतलं. त्यामुळं सतेज पाटील यांची नाराजी आणखी वाढली आहे.

2019 च्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाडिकांना पराभूत करण्याचा चंग सतेज पाटील यांनी बांधला आहे. माझं ध्येय निश्चित आहे म्हणत त्यांनी संजय मंडलिक यांना खासदार करणार हे स्पष्ट केलं आहे. तिकडे राष्ट्रवादीमधील काही नेते मंडळी देखील खासदार धनंजय महाडिक यांच्यावर नाराज आहेत. कारण महाडिक निवडून आले राष्ट्रवादीमधून पण त्यांची जवळीक भाजपसोबत जास्त वाढली. त्यामुळं हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांनी ही तक्रार मोठ्या पवारांकडे केली.मात्र त्यानंतर पवारांची मर्जी राखण्यात महाडिक यशस्वी ठरले. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महाडिकांना किती प्रामाणिकपणे स्वीकारतात याबद्दल शंका आहे.

2014 मधील निकाल

धनंजय महाडिक यांना 2014 च्या निवडणुकीत एकूण 6 लाख 7 हजार मतं मिळाली

त्याचवेळी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना 5 लाख 74 हजार मतं मिळाली

म्हणजे खासदार महाडिक हे केवळ 31 हजार मतांनी विजयी झाले

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपच्या एका आमदाराची ताकद आहे.

17 लाख 22 हजार मतदारांची संख्या याठिकाणी आहे, यात महिला 8 लाख 32 हजार तर पुरुष 8 लाख 89 हजार मतदार आहेत.

गेल्या निवडणुकीत 70 टक्के मतदान झालं होतं 

धनंजय महाडिकांचं कार्य

खासदार धनंजय महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मतदार संघात कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न, पासपोर्ट कार्य़ालय आणि सॅनिटरी नॅपकिनचा प्रश्न संसदेत उपस्थित केला. याची दखल घेऊन मनेका गांधी यांनी महाडिकांच्या प्रश्नावरुन राज्य शासनाला आदेश दिले. मराठा आरक्षण आणि कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं असे अनेक प्रश्न त्यांनी संसदेत मांडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकतंच त्यांना संसदेचे उपनेतेपद म्हणून जबाबदारी दिली आहे. याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.

राष्ट्रवादीतूनच विरोध

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेची युती झाल्यास संजय मंडलिक आणि महाडिक यांचीच लढत होणार हे निश्चित आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा, शिवाय साखर कारखान्याच्या माध्यमातून संजय मंडलिक यांनी आपला गट कायम ठेवला आहे. येत्या लोकसभेला त्यांना सतेज पाटील आणि राष्ट्रवादीतील नाराजांची मदत मिळू शकते. त्यामुळं महाडिकांना ही निवडणूक सोपी जाईल असं म्हणता येणार नाही. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची राष्ट्रवादीतली बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी शरद पवारांनी वारंवार कोल्हापूरचा दौरा केला. सध्या तरी महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित मानली जाते. पवारांनी नेत्यांची मनधरणी केली असली तरी कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. त्यामुळं कोल्हापूरमधल्या राजकीय घडामोडीकडे राज्यातल्या दिग्गज नेत्यांचं लक्ष असणार आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI