पालघर लोकसभा : यावेळीही चिंतामण वनगांच्या मुलाचा मार्ग खडतर?

पालघर लोकसभा : यावेळीही चिंतामण वनगांच्या मुलाचा मार्ग खडतर?

पालघर : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. मोदी लाटेत 2014 ला पालघर मतदारसंघात भाजपचे दिवंगत नेते चिंतामण वनगा हे 2 लाख 39 हजार 520 मतांनी जिंकून आले होते. या निवडणुकीत त्यांना 5 लाख 33 हजार 201 मते मिळाली. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 681 मते मिळाली होती. या निवडणुकीत बळीराम जाधव यांचा पराभव झाला होता. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याने काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता.

2018 मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर खासदारकीच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. यामध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी शिवेसेनेचे उमेदवार आणि दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना पराजित करून पोटनिवडणूक जिंकली.

पोटनिवडणुकीत मिळालेली मते

या पोटनिवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, तर बहुजन विकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती. पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित काँग्रेसची साथ सोडून अचानक शेवटच्या क्षणी भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला याचा मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेसला येथे कमी मते मिळाली आणि काँग्रेसची डिपॉजिट जप्त झाल्याची नामुश्की उमेदवार दामू शिंगडा यांच्यावर ओढावली.

2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपतर्फे उभे राहिलेले राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा 29 हजार 572 मतांनी पराभव केला. यामध्ये श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 210 मते मिळाली होती. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 222838, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरणला यांना 71 हजार 887, तर काँग्रेसचे दामू शिंगडा यांना 47714 इतकी मते मिळाली.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतांचं समीकरण

पालघर लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेला आहे. यामध्ये पालघर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा, वसई आणि बोईसर अशा सहा  विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामधील पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, हे चार विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तर नालासोपारा वसई हे विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारण मतदार संघातील आहे. सहा मतदारसंघांपैकी विक्रमगड मतदारसंघ शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्यास या मतदारसंघात ,भाजपा, शिवसेना, माकप, बहुजन अशी लढत असली तरी ही निवडणूक तिरंगीच होणार असे दिसत आहे. माकप सामील झाला नाही तर निवडणुकीच्या रिंगणात मात्र आतापर्यंतची त्यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी लक्षात घेतल्यास माकप या स्पर्धेत नसेल.

शिवसेना-भाजप बहुजन विकास आघाडी अशा तिरंगी लढतीत बहुजन विकास आघाडीचे पारडे जड जाईल अशी शक्यता आहे. 2018 मधील पोटनिवडणुकीमध्ये भाजप विजयी झाली असली तरी या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकली होती. 2019 मधील निवडणुकीत मात्र असे घडणार नाही. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या मतांची बेरीज आणि वजन विजयाकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे.

पालघरमधील सहापैकी बोईसर, नालासोपारा, वसई हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडे आहेत. तर विक्रमगड आणि डहाणू भाजपकडे आहे. तसेच पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यामध्ये विक्रमगड, वाडा, जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील समावेश होतो. तर पालघर मतदारसंघामध्ये पालघर आणि डहाणू तालुक्यातील गावांचा समावेश आहे. डहाणू मतदारसंघामध्ये तलासरी तालुका शेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे, तर बोईसर मतदारसंघामध्ये पालघर तालुक्यातील काही भागात विशेषतः पूर्वेकडील भागातील अंतर्भूत आहे.

याव्यतिरिक्त वसई तालुक्यातील नालासोपाऱ्याचा काही भाग यात अंतर्भूत आहे. नालासोपारा वसई हे दोन मतदारसंघ वसई तालुक्यात विभाजन झालेले आहेत. हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नागरी बहुल मतदारसंघ आहेत. 2019 मधील निवडणूक कशी राहणार हे राजकीय समीकरणे करणार यावर अवलंबून राहिल. शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यास शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे उमेदवार असतील, तर भाजपतर्फे राजेंद्र गावित यांची उमेदवारी असेल. बहुजन विकास आघाडीतर्फे 2018 मधील पोटनिवडणूक हरलेले आणि 2009 मध्ये विजयी झालेले बळीराम जाधव हेच उमेदवार असतील.

विद्यमान खासदारांचे सकारात्मक मुद्दे

वसई, नालासोपारा हे दोन मतदारसंघ मतदारांच्या संख्या लक्षात घेता महत्त्वाचे आहेत. या पार्श्वभूमीवर राजेंद्र गावितांनी वसई आणि नालासोपारा मतदारसंघ वळवला आहे. पाणी परिषद घेऊन ते आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपल्या नेहमीप्रमाणे बहुजन विकास आघाडी यांना आव्हान देताना दिसत आहे. मात्र त्याचबरोबरीने गावित स्वतःच्या गटाचे राजकारण करत असल्याचा ठपका भाजपमधील जुन्या गटाकडून होत आहे. येत्या निवडणुकीत सामोरे जाताना गावित यांना हा संघर्ष मिटवावा लागेल.

विद्यमान खासदारांचे नकारात्मक मुद्दे

पालघर जिल्ह्यातील MMRD आराखडा, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग, मुंबई वडोदरा एक्स्प्रेस वे, समुद्र किनारे व्यवस्थापन आराखडा, वाढवण बंदर आदी विनाशकारी प्रकल्प येऊ घातल्याने आदिवासी, भूमीपुत्र, शेतकरी आणि मच्छीमरांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला येथे मतं मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्याचबरोबर गावित स्वतःच्या गटाचे राजकारण करत असल्याचा ठपका भाजपमधील जुन्या गटाकडून होत आहे.

बहुजन विकास आघाडीचे सकारात्त्मक मुद्दे

वसई आणि नालासोपारा हे दोन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचे आजवर बालेकिल्ला मानले जातात. अलिकडील 2018 ला पोटनिवडणुकीत बहुजनच्या मतांमध्ये पूर्वीच्या तुलनेत घट झाली असली तरी आगामी निवडणुकीत या दोन मतदारसंघासह बोईसर मतदारसंघातील वसई तालुक्यातील भागावर बहुजन विकास आघाडी आपले लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे. बविआची वसई महापालिकेवर सत्ता आहे. त्याचबरोबर वसई नालासोपारा मतदारसंघ, बोईसर मतदार संघातील आमदारांची कामगिरी या आधारे बहुजन विकास आघाडी आपली मतांची बेगमी करणार आहे. वसई विरारला सूर्याचे पाणी मिळवून दिले याचाही लाभ उठवण्याचा बहुजन चा प्रयत्न असेल.

मुख्य विरोधक शिवसेनेचे सकारात्मक मुद्दे

पालघर जिल्ह्यातील MMRD आराखडा, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग, मुंबई वडोदरा एक्स्प्रेस वे, समुद्र किनारे व्यवस्थापन आराखडा, वाढवण बंदर आदी विनाशकारी प्रकल्प येऊ घातल्याने आदिवासी, भूमिपुत्र, शेतकरी आणि मच्छीमरांचा या प्रकल्पाला विरोध आहे. शिवसेनेने वाढवण बंदराला आणि बुलेट ट्रेन प्रकल्पालाही विरोध दर्शवून ते स्थानिकांच्या सोबत राहिल्यामुळे त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो.

पालघर जिल्ह्यातील मुख्य मुद्दे

पालघर जिल्ह्यातील  कुपोषण, रोजगार, जिल्ह्याचा विकास, जिल्ह्यातील  MMRD आराखडा हे प्रश्न तर प्रलंबित आहेतच. पण बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग, मुंबई वडोदरा एक्स्प्रेस वे, समुद्र किनारे व्यवस्थापन आराखडा, वाढवण बंदर, रिलायन्स गॅस पाईपलाईन या प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI