रामटेक लोकसभा : युती न झाल्यास शिवसेनेच्या मतदारसंघात काँग्रेसला फायदा

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदार संघ अतिशय मोठा आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा पराभव झाला, तर शिवसेनेचा झेंडा इथे फडकला. या वेळी शिवसेनेला आपला गड राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेसला …

रामटेक लोकसभा : युती न झाल्यास शिवसेनेच्या मतदारसंघात काँग्रेसला फायदा

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदार संघ अतिशय मोठा आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा पराभव झाला, तर शिवसेनेचा झेंडा इथे फडकला. या वेळी शिवसेनेला आपला गड राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेसला आपला बालेकिल्ला मिळवण्यासाठी मैदान गाजवावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी सुद्धा आपलं भाग्य अजमावलं आहे.

2014 चं चित्र काय होतं?

नागपूरचा ग्रामीण भाग म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर कृपाल तुमाणे यांनी 2014 ची निवडणूक लढवली, तर काँग्रेसच्या तिकिटावर काँग्रेसचे महासचिव आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असलेले मुकूल वासनिक होते. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा चांगला प्रभाव होता. शिवसेना-भाजपने युतीमध्ये निवडणूक लढवली आणि शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी झाले. या आधीही कृपाल तुमाणे आणि मुकूल वासनिक आमने सामने होते. मात्र तुमाणे यांना पराभव पत्करावा लागला होता. 2014 च्या निवडणुकीत बाजू पलटली, मोदी लाट चालली आणि शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी झाले.  त्यांना 5 लाख 19 हजार 892 मते मिळाली, तर मुकूल वासनिक यांना 3 लाख 44 हजार 101 मते मिळाली.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा क्षेत्रात रामटेक, काटोल, सावनेर, उमरेड, हिंगणा, कामठी हे विधानसभेचे मतदारसंघ आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत या विधानसभेपैकी फक्त एका ठिकाणी सावनेरमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं, तर पाच ठिकाणी भाजपने बाजी मारली होती.

मतविभाजनाचं समीकरण कसं असेल?

हा मतदार संघ बघितला तर संपूर्णपणे ग्रामीण आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर काही क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत. काटोल कळमेश्वर क्षेत्रात संत्रा उत्पादक आहे, तर उमरेड आणि रामटेक क्षेत्रात धान उत्पादक शेतकऱ्यांचा पगडा आहे. रामटेक आणि उमरेड या परिसरात शिवसेनेचा दबदबा असला तरी काटोल, कळमेश्वर भागात अनिल देशमुख यांचा म्हणजे राष्ट्रवादीचा दबदबा आहे. मात्र गेल्या विधानसभेत हा मतदारसंघ भाजपने काबिज केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडली. सावनेर भागात मात्र काँग्रेसचा चांगला दबदबा आहे आणि मोदी लाटेतही सुनील केदार यांनी ही जागा राखून ठेवली.

या मतदार संघात लोकसभेसाठी इच्छुकांची कमी नाही. मात्र दोन वेळा या ठिकाणी मुकूल वासनिक यांना काँग्रेसने तिकीट दिलं. त्यापैकी एकदा ते विजयी झाले, तर एकदा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस यावेळी मुकूल वासनिक यांना तिकीट देणार की नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवाराला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून नितीन राऊत यांचाही विचार होण्याची चर्चा आहे. तर शिवसेना मात्र या ठिकाणी आपला विजयी उमेदवार असलेल्या कृपाल तुमाने यांनाच तिकीट देण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपची युती झाली नाही तर या ठिकाणी भाजपही आपला उमेदवार उतरवू शकते आणि त्यासाठी त्यांच्याकडे अनेक इच्छुकांची फौज तयार आहे.

या लोकसभा क्षेत्रात जातीचे राजकारणही फार महत्त्वाचं ठरतं. कारण, त्यातच हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने उमेदवारांचा शोधही तेवढाच महत्त्वाचा आहे. युती न झाल्यास शिवसेनेला या ठिकाणी फार मेहनत करावी लागणार आहे. तर भाजपने या ठिकाणी तगडा उमेदवार निर्माण केल्यास मात्र मतांचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा या ठिकाणी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच या मतदारसंघात प्रत्येक पक्षाने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *