अंबानींच्या सोहळ्यातील भाऊ तेजसच्या डान्सवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
"पहिली गोष्ट ही आहे की, विरोधक कोण आहेत? त्यांना या परिवाराचा विरोध आहे का? एक मुख्य गोष्ट अशी आहे की, अंबानी कुटुंब आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हे आतापासून नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहेत", असं आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाचा संगीत सोहळा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे हा अनंत अंबानीच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यात नृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर संबंधित व्हिडीओ ट्विट करत तेजस ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी तेजस ठाकरे यांना नाच्या म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळत आहे.
तेजस ठाकरे हे तसे राजकारणापासून लांब आहेत. ते वन्यजीवांच्या संशोधन तथा जैवविविधतेच्या अभ्यास क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी साप, खेकडा, पाल आणि सरडा या वन्यजीवांच्या नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांचं या क्षेत्राशी संबंधित काम सुरुच असतं. तेजस ठाकरे याआधी विविध जीवांच्या नव्या प्रजातींच्या संशोधनामुळे चर्चेत आले होते. पण यावेळी ते अंबानींच्या संगीत कार्यक्रमात नृत्य करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. या टीकेवर त्यांचे मोठे बंधू आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“पहिली गोष्ट ही आहे की, विरोधक कोण आहेत? त्यांना या परिवाराचा विरोध आहे का? एक मुख्य गोष्ट अशी आहे की, अंबानी कुटुंब आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हे आतापासून नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धिरुभाई अंबानी या दोघांचे संबंध चांगले होते, त्यांच्यात मैत्री होती. दोन्ही कुटुंबांची आता ही तिसरी पिढी आहे. आम्ही जे केलं ते अभिमानाने केलं आहे आणि कौटुंबिक कार्यक्रम होता. मुख्य गोष्ट हीच आहे की, इथे जे जॉब आणतात त्यांना विरोध का करतात? भाजपची पोटदुखी ही त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात रोजगार आणत आहेत”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
ठाकरे गटाचे विधान परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी महायुतीच्या नेत्यांच्यादेखील भेटीगाठी घेतल्या आहेत. याबाबत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, “मिलिंद नार्वेकर हे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे खेळणारे आहेत. त्यांना क्रिकेट जास्त माहिती आहे. त्यामुळे मी त्या मुद्द्यावर जाणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
