हालचाली वाढल्या, 8 तास झाडाझडती, एसीबी साळवींना घेऊन बँकेच्या दिशेला, कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Jan 18, 2024 | 5:52 PM

एसीबी अधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या घराची आज सकाळपासून तब्बल आठ तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबी राजन साळवी यांना घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिशेला रवाना झाली आहे. एसीबीचं पथक साळवी यांच्या घराबाहेर पडलं तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

हालचाली वाढल्या, 8 तास झाडाझडती, एसीबी साळवींना घेऊन बँकेच्या दिशेला, कार्यकर्ते आक्रमक
Follow us on

मनोज लेले, रत्नागिरी | 18 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसीबीकडून आज सकाळपासून त्यांच्याविरोधात छापेमारी सुरु आहे. एसीबीच्या पथकाने आज सकाळी त्यांच्या घरावर छापा टाकला. तेव्हापासून एसीबीकडून झाडाझडती सुरु होती. गेल्या आठ तासांपासून राजन साळवी यांच्या घरात एसीबीचं पथक झाडाझडती घेत होतं. त्यानंतर आता एसीबीचं पथक राजन साळवी यांना घेऊन जिल्हा बँकेच्या दिशेला रवाना झालं आहे. एसीबीचं पथक राजन साळवी यांना घेऊन घराबाहेर पडलं तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राजन साळवी यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे. एसीबीचं पथक साळवी यांच्या घराबाहेर पडलं तेव्हा हे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

एसीबीचं पथक राजन साळवी यांना घेऊन कुठे चाललं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राजन साळवी यांना पोलिसांच्या गाडीतून नेलं जात होतं. पण कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. राजन साळवी यांना त्यांच्या गाडीनेच जाऊ द्या, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यानंतर राजन साळवी यांना त्यांच्या गाडीतून जाण्यास परवानगी मिळाली. ते आपल्या गाडीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिशेला रवाना झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजन साळवी यांचे लॉकर्स आहेत, काही कागदपत्रे आहेत, ते तपासल्यानंतर एसीबी पुढचा निर्णय घेईल, अशी माहिती समोर आली आहे.

राजन साळवी यांना अटक होणार?

राजन साळवी यांच्यावर एसीबीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचा आज पहिला दिवस नाही. याआधीदेखील साळवी यांची सहा वेळा चौकशी करण्यात आली आहे. साळवींवर उत्पन्नापेक्षा 118 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप आहे. त्याचविरोधात कारवाई सुरु आहे. एसीबीने आज सकाळपासून साळवी यांच्या घराची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत एसीबीने साळवी यांच्या घरात सापडलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली आहे. त्यानंतर आता एसीबीचं पथक साळवी यांच्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांची छाननी करणार आहे.

या प्रकरणी बेनामी संपत्ती जमवल्याचा ठपका ठेवत एसीबीने साळवी यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे साळवी यांना आता अटक केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, साळवी यांनी आपण अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाही. याउलट आपण पोलीस कस्टडीला सामोरं जाऊ, अशी भूमिका मांडली आहे.