
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड भागात गोळीबाराची घटना घडली होती. पोलीस स्टेशनपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुंड निलेश घायवळ याच्यासह दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा मकोका अंतर्गत कारवाई केली. गुन्हा दाखल होताच निलेश घायवळ हा फरार झाला. दरम्यान तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर निलेश घायवळ याच्यावर मकोका सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना, तो लंडनला कसा पळून गेला आणि त्याला पासपोर्टन नेमका कसा मिळाला? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आता या प्रकरणात आणि निलेश घायवळच्या पासपोर्ट संदर्भात पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय म्हटलं?
पुण्यातील गोळीबार प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला आहे, मात्र त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला? याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निलेश घायवळ याने पासपोर्ट काढताना सुद्धा मोठं कांड केलं आहे. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणात आरोपी असलेल्या घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळने पासपोर्ट काढण्यासाठी चुकीचा पत्ता दिल्याचे तपासातून समोर आलं आहे.
शासनाच्या अनेक यंत्रणांची फसवणूक करून निलेश घायवळने पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे. पुण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला नसता, त्यामुळे त्याने थेट अहिल्यानगरमधील एक चुकीचा पत्ता दाखवत संबंधित यंत्रणांकडे कागदपत्रे सादर केली, आणि पासपोर्ट मिळवला. दरम्यान त्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी त्याने अहिल्यानगर येथील जो पत्ता सांगितला होता, त्या पत्त्यावर जाऊन पाहाणी केली होती, मात्र तो तिथे आढळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी पत्त्यावर घायवळ आढळून आला नाही, घायवळ “not available” असा शेरा देखील दिला. मात्र तरी सुद्धा त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. घायवळ हा लंडनला पळून गेला असून, पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात
लुक आऊट नोटीस जारी केली आहे, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.