
एखाद्या चित्रपटात घडावी तशी घटना नांदेडमध्ये घडली. प्रियसीच्या कुटुंबियांनी सक्षम ताटे याची हत्या केली. आपण ज्याच्यावर प्रेम केले आणि आयुष्यभर ज्याच्यासोबत जगण्याची स्वप्ने पाहत होतो तोच या जगात राहिला नसल्याचे कळताच प्रियसी आचल मामीलवाड सक्षमच्या घरी पोहोचली आणि तिने एकच डाहो फोडला. आचलचे रडणे बघू प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला. हेच नाही तर सक्षम गेला पण त्याचीच बायको म्हणून आयुष्यभर जगण्याचा निर्णय आचल हिने घेतला आणि थेट त्याच्या मृतदेहासोबतच लग्न केले. लग्नाच्या जवळपास विधी तिने सक्षमच्या मृतदेहासोबत केल्या. त्याच्या चेहऱ्यावर हळदही लावली. हेच नाही तर सक्षमला कशाप्रकारे आपल्या वडिलांनी आणि भावाने मारले हे तिने स्पष्ट शब्दात सांगितले.
आचल मामीलवाड हिच्या कुटुंबियांनी पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे. फक्त आचलचे कुटुंबियच नाही तर आचल ज्याच्यावर प्रेम करायची त्या सक्षम ताटे याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सक्षम याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती. आता आचल मामीलवाड हिने नुकताच अत्यंत मोठा आणि धक्कादायक असा दावा केला. तिने स्पष्ट सांगितले की, सक्षम ताटे याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याला खोट्या केसमध्ये फसवण्यात आले.
माझे भाऊ आणि सक्षम मित्र होते, तो कायमच आमच्या घरी येत होता. तीन वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध होते. मात्र, यादरम्यान माझ्या घरच्यांना आमच्या प्रेमसंबंधाची माहिती झाली. सक्षमवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी ते माझ्यावर दबाव टाकत होते. त्यांनी मला धमक्या दिल्या त्याला मारण्याच्या. वर्षभरापूर्वी सक्षमवर विनयभंगाची केस केली होती. त्यानंतर मी 18 वर्षाची झाली आणि मग मी कोर्टात सक्षमच्या बाजुने बोलले.
त्यादरम्यान माझ्यासोबत नेमके काय काय घडते होते, याची सर्व कल्पना मी सक्षम याला दिली होती. हेच नाही तर मी सक्षमला बोलले होते की, चल आपण दोघे पळून जाऊ.. मी त्याच्यासोबत यायला तयार आहे. पण सक्षमने मला म्हटले की, तुझ्या वडिलांची खूप जास्त इज्जत आहे. आपण असे पळून जायला नको. सक्षम याच्या हत्येची चर्चा आता राज्यभर रंगताना दिसत आहे.