“…तोपर्यंत मी धनंजय मुंडेंचे घोटाळे काढत राहणार”, अंजली दमानियांचा थेट इशारा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर २०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. कृषी पंप आणि इतर योजनांमधील कथित अनियमिततांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता अंजली दमानिया यांनी सरकारी कार्यप्रणालीवरुन धनजंय मुंडे आणि त्यांच्या खात्यावर आरोप केले होते. धनंजय मुंडे यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगत सरकारी जीआर काढण्याची कार्यप्रणाली नेमकी कशी चालते याची नीट माहिती घ्यावी, असा घणाघात केला होता. त्यावर आता अंजली दमानिया यांनी मी धनंजय मुंडेंचा पाठलाग सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.
तोपर्यंत मी त्यांचा पाठलाग सोडणार नाही
अंजली दमानिया यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी तब्बल 200 कोटींचा घोटाळा केला आहे. कागदोपत्री फेरफार करण्यात आली आहे. त्यांनी अनेक घोटाळे केले आहेत. जोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी त्यांचा पाठलाग सोडणार नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
“कृषी पंप घोटाळ्यात डीलर्स वेगळे घेण्यात आले. पहिला सप्लाय ओडीसाला केला. इफ्कोला सांगण्यापेक्षा या डिलर्सला काम दिलं. प्रा टेंडर बीडमध्ये इफ्कोही हजर होतं. पण त्यांना विचारात घेतलं गेलं नाही. नॅनो युरीया हे फेल प्रोडक्ट होतं, तरी देखील वापरण्यात आलं. डीबीटीतून वगळून हे राबवण्यात आलं. या सगळ्या गोष्ठीची चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
तब्बल 200 कोटींचा घोटाळा
“मंत्री धनंजय मुंडे हे पत्र लिहून GR काढा आणि पैसे वर्ग करावे असे निर्देश देतात. यात २३ आणि ३० सप्टेंबरला मंत्रिमंडळ मंजुरी मिळाली, असे यात लिहिले आहे. परंतु २३ किंवा ३० ला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाला. कागदोपत्री फेरफार केली गेली आहे”, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
“आता विजय कुंभार यांनी पण त्यांच्यावर आरोप केले आहेत. ते देखील गंभीर आहेत. याची पण चौकशी व्हायला हवी. हे एक प्रकरण नाही. असे अनेक घोटाळे धनंजय मुंडेंनी केले आहेत. जेव्हा घोटाळे होतात तेव्हा हे अधिकारी का बोलत नाहीत, हा देखील माझा त्यांना सवाल आहे. एंब्युलंस घोटाळा नेमका काय हे पहावं लागेल. मी माहिती घेऊन यावर भाष्य करेन. जो पर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी त्यांचा पाठलाग सोडणार नाही. तोपर्यंत त्यांचे घोटाळे काढतच राहणार”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
