Vaishnavi Hagavane Csse : ही माणसं शिकलेली, श्रीमंत असली तरी.. वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर अभिनेत्रीचा संताप
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहीतेच्या मृत्यूप्रकरणात आज तिच्या फरार सासऱ्यांना आणि दिरालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अख्ख्या राज्यभरात संतापाचे वातावरण असून अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध केला आहे. आई कुठे काय करते फेम विख्यात अभिनेत्रीनेही पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहीतेच्या मृत्यूप्रकरणात आज तिच्या फरार सासऱ्यांना आणि दिरालाही अटक करण्यात आली आहे. स्वारगेट परिसरातून आज पहाटे पोलिसांनी राजेंद्र आणि सुशील हगवणेला अटक केली. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. वैष्णवीचा हुंड्यासाठी प्रचंड छळ करून, तिला मारहाणही करण्यात आली. रोजच्या छळाला वैतागून तिने अखेर जीव दिला, मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून हा हुंडाबळी असल्याचे वैष्णवीच्या माहेरच्यांचे म्हणणे आहे. मकोका लावून तिच्या सारसरच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी वैष्णवीच्या आई-वडिलांनी केली आहे.
दरम्यान या प्रकारामुळे फक्त पुण्यातच नव्हे तर अख्ख्या राज्यभरात संतापाचे वातावरण असून सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. प्रवीण तरडे, हेमंत ढोमे यांच्या नंतर आता अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनेगही या घटनेवर भाष्य केलं असून सोशल मीडियावरील तिची पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण आत्ता दाबलं तर पैसे पद यांचा विजय आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असेही अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
अश्विनीची पोस्ट काय ?
आई कुठे काय करते, यासहव अनेक मालिका, चित्रपटात झळकलेल्या अश्विनीने या ज्वलंत मुद्यावर भाष्य केलं आहे. ‘ ही माणसं शिकलेली, पैशाने श्रीमंत असली तरी ही मानसिकता की सुनेला मारहाण करून दर वेळी माहेर कडून काही न काही आणायला सांगणे ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी… आता जर हे प्रकरण दाबले तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलं जाईल’ असं अश्विनीने तिच्या इन्स्टा स्टोरीच्या पोस्टवर लिहीलं असून त्यामध्ये तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांना त्यात टॅग केलं आहे.
आपलीच लाडकी बहीण , या घटनेचा जाहीर निषेध असंही अश्विनीने लिहीलं आहे.