आदित्य ठाकरे यांना पाळावा लागणार शिंदे गटाच्या प्रतोदांचा व्हीप? तर होणार अपात्रतेची कारवाई…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळात एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यामुळे व्हीप बजावण्याचा अधिकार हा आपसूकच भरत गोगावले यांच्याकडे आला. आपल्या आधीच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष यांनी पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबई | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्र प्रकरणी निकालाचे वाचन करताना ठाकरे गटाला मोठा झटका दिला. विधिमंडळात शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे. तसेच, शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होऊ शकत नाही असा महत्वाचा निर्णय दिला. त्याचसोबत ठाकरे गटाचे आमदारही पत्र असल्याचा निर्णय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यामुळे आता विधानसभेत व्हीप बजावण्याचा अधिकार कुणाचा? आणि आदित्य ठाकरे हे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप पाळणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
शिंदे यांनी गुवाहाटी येथे विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती जाहीर केली. तर, विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती.
विधीमंडळातील या घडामोडीविरोधात दोन्ही गटांनी कोर्टात धाव घेतली होती. दोन्ही गट आपलाच पक्ष खरा असे म्हणत होते. त्याचवेळी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. तर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळात एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यामुळे व्हीप बजावण्याचा अधिकार हा आपसूकच भरत गोगावले यांच्याकडे आला. आपल्या आधीच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष यांनी पुन्हा शिक्कामोर्तब करत शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप मान्य करावा लागेल असे स्पष्ट केले आहे.
विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावला होता. राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 55 आमदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहावे, असा व्हिप बजावला होता. मात्र, त्यावेळी ठाकरे गटाच्या आमदारांनी आम्हाला व्हीप लागू होत नाही असे म्हणत व्हीप धुडकावून लावला होता.
आता विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्य प्रतोद यांना व्हीप बजावण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभेत आमदार असलेले आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप पाळावा लागणार आहे. जर ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी जर पक्षाने म्हणजेच भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप पाळला नाही तर मात्र त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते असे सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.
